• Mon. Jun 15th, 2026
    मुंढेंच्या पाठीशी शासन ठामपणे उभं! FDA महिला अधिकाऱ्याला चिरडण्याच्या प्रयत्नानंतर मंत्री नरहरी झिरवाळ संतप्त, गुटखामाफियांना कडक इशारा

    गुटखा माफियांविरोधातील कारवाईदरम्यान महिला अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई/ छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

    घटनेवर संताप व्यक्त

    या घटनेचा तीव्र निषेध करत मंत्री झिरवाळ यांनी गुटखा माफियांना कडक इशारा दिला आहे. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

    “कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत शासन गंभीर आहे. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. संबंधित महिला अधिकाऱ्यांसह संपूर्ण विभागाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे,” असे झिरवाळ यांनी सांगितले.

    दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

    या प्रकरणातील आरोपी आणि संबंधित गुटखा माफियांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    राज्यभर कारवाईची मोहीम

    अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर गुटखा, प्रतिबंधित पदार्थ आणि बनावट खाद्यपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कारवायांना अडथळा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

    ‘कायद्यापुढे कुणालाही सवलत नाही’

    मात्र अशा दबावाला प्रशासन बळी पडणार नसल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे सांगताना त्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली जाईल, असा इशाराही दिला.

    “जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे झिरवाळ यांनी ठामपणे सांगितले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा