• Wed. Jun 10th, 2026
    उमरखाडीतल्या 81 जुन्या इमारती पडणार, म्हाडा उभारणार 40 अन् 81 मजल्यांचे 7 गगनचुंबी टॉवर्स, पण निवासी रहिवाशांना काय मिळणार?

    दक्षिण मुंबईत म्हाडाने आता नव्या प्लॅनसह पुनर्विकासाचा आराखडा बनवण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या जागेवर आता म्हाडाकडून सात गगनचुंबी इमारती उभारण्याचा मोठे नियोजन केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या समूह पुनर्विकासानंतर आता भायखळ्यातील उमरखाडी परिसराच्या कायापालटाची तयारी सुरू झाली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने उमरखाडीतील ६.२३ एकर क्षेत्रावरील ८१ जुन्या इमारतींच्या समूह पुनर्विकासाचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पामुळे दोन हजारांहून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन होणार असून परिसरात उंच निवासी संकुले उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.

    उमरखाडीतील ८१ इमारतींचा समूह पुनर्विकास

    कामाठीपुरा पुनर्विकासासाठी अवलंबलेल्या बांधकाम आणि विकास संस्था (सी अँड डी) प्रारूपानुसारच उमरखाडी परिसराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाने तयार केलेल्या प्राथमिक प्रस्तावानुसार या भागातील ८१ इमारती एकत्रितपणे पुनर्विकासासाठी घेतल्या जाणार आहेत. यामध्ये ९ पीएमजीपी इमारतींसह उपकरप्राप्त आणि काही खासगी इमारतींचाही समावेश आहे.

    या इमारतींमध्ये एकूण १,९२८ निवासी आणि २६८ अनिवासी गाळे आहेत. बहुतांश इमारती दुरुस्तीपलीकडे गेल्याचे सांगितले जात असून पुनर्विकासाला मंजुरी मिळाल्यास रहिवाशांच्या सुरक्षित निवासाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

    Maharashtra TimesCrime News: लग्न करायचं असेल तर आधी…; मॉडेलसोबत 10 वर्ष संबंध, 3 वेळा गर्भपात अन् 60 लाखांची फसवणूक

    सात गगनचुंबी इमारती उभारणार

    प्राथमिक आराखड्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या ८१ इमारतींच्या जागी ४० ते ८१ मजल्यांच्या सात उंच इमारती उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून परिसराचे संपूर्ण रूपांतर करण्याचा म्हाडाचा मानस आहे. पुनर्विकासानंतर आधुनिक सुविधा आणि नियोजनबद्ध पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

    ४,५०० कोटींहून अधिक खर्चाचा प्रकल्प

    या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ४,५०१.९७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंडळाच्या अंदाजानुसार, सी अँड डी प्रारूपानुसार प्रकल्प राबविल्यास सुमारे १,०४१.७४ कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो. त्यामुळे याच प्रारूपाला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    mhada mumbai

    रहिवाशांना भाडे अनुदान

    प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पात्रता निश्चितीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर इमारती रिकाम्या करून पुनर्विकासाची अंमलबजावणी केली जाईल. पात्र निवासी रहिवाशांना दरमहा २५ हजार रुपये घरभाडे दिले जाणार असून दुसऱ्या वर्षी ते २७,५०० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ३०,२५० रुपयांपर्यंत वाढविले जाणार आहे.

    अनिवासी गाळेधारकांना प्रति चौरस फूट १०० रुपये दराने भाडे दिले जाणार असून त्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

    राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

    उमरखाडी पुनर्विकासाचा प्राथमिक प्रस्ताव तयार झाला असून आता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रस्ताव अंतिम झाल्यानंतर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच या बहुचर्चित पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा