• Wed. Jun 10th, 2026
    Dadar Plaza Best Bus Accident: लग्नासाठी 17 जूनला गावी जाणार होता; पण त्याआधीच सगळं बिघडलं! दादर बस अपघातात डिलिव्हरी बॉय नियाजचा वेदनादायी शेवट

    लग्नासाठी गावी जाण्याची तयारी सुरू होती… पण दादरच्या भीषण बस अपघाताने २३ वर्षीय नियाजचे आयुष्यच संपले, ही कहाणी वाचून अंगावर काटा येतो आहे. आज सकाळी झालेल्या या दुर्घटनेत आणखी एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईतील दादर प्लाझा परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी एका २३ वर्षीय तरुणाचे अवघ्या काही महिन्यांत लग्न होणार होते. मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. मिळालेल्या माहितीनुसार, प्लाझा ते काळाकिल्ला मार्गावरील ४६३ क्रमांकाची बेस्ट बस पहिल्या फेरीसाठी निघाली होती. बसमध्ये चालक, वाहक आणि बेस्टचे निरीक्षक उपस्थित होते. बस सुरू करताना हँडब्रेक काढल्यानंतर वाहन अचानक वेगाने पुढे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चालकाने बसचे ब्रेक काम करत नसल्याचेही सांगितल्याचे कळते.

    भरधाव झालेली बस समोरून जाणाऱ्या चार पादचाऱ्यांवर आदळली. त्यानंतर बस नियंत्रणात आणण्यासाठी चालकाने वाहन प्लाझाच्या दिशेने वळविल्याची माहिती आहे. शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहने असल्याने मोठी दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

    नियाज शेख होता डिलिव्हरी बॉय

    या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख नियाज अहमद शेख अशी पटली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला नियाज रोजगाराच्या शोधात मुंबईत आला होता. तो स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आणि नळबाजार परिसरात राहत होता.

    अपघाताच्या दिवशीही तो कामासाठी बाहेर पडला होता. डिलिव्हरीसाठी जात असताना त्याच्या दुचाकीला बसची धडक बसली. येत्या १७ तारखेला तो गावी जाणार होता. त्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांत त्याचा विवाह होणार होता. मात्र एका क्षणात सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली, अशी भावना त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

    जखमी ऋषभवर उपचार

    दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २४ वर्षीय ऋषभ गुप्ता याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषभ एफवाय बीकॉमचे शिक्षण घेत असून शिक्षणासोबत इन्स्टा मार्टसाठी डिलिव्हरीचे कामही करत होता. अपघाताच्या दिवशी त्याचे महाविद्यालयीन असाइनमेंट सादर करण्याचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर तो डिलिव्हरीसाठी निघाला होता.

    दादर परिसरातून पुढे जात असताना बेस्ट बसच्या धडकेत तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. कुटुंबीयांनी बेस्ट प्रशासनावर नाराजी व्यक्त करत अपघातानंतर अधिकाऱ्यांनी साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप केला आहे.

    चालक विकास पाडावेविरोधात गुन्हा दाखल

    या प्रकरणी बेस्ट बस चालक विकास पाडावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कारवाई केली आहे. अपघातात चालकही जखमी झाला असून त्याच्यावरही सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा