• Fri. Sep 11th, 2026

सारथी इमारतीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करा- मंत्री शिवेंद्रराजे भोसले – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 11, 2026

अमरावती, दि. 11 (जिमाका): छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) अमरावती  प्रादेशिक कार्यालयाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज संबंधित यंत्रणांना दिल्या.

नवसारी परिसर स्थित निर्माणाधीन सारथी  प्रादेशिक कार्यालयाला मंत्री श्री. भोसले यांनी भेट दिली. आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, प्रवीण पोटे, सारथीचे उप व्यवस्थापक सचिन सेजल, सार्वजनिक बांधकाम अमरावती प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता सुषमा बोंद्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

येथील 2.24 हेक्टर परिसरात सारथीच्या निर्माणाधीन मुला-मुलींचे वसतिगृह, प्रशासकीय इमारत, सभागृह, उपहारगृह, ग्रंथालय व अभ्यासिका इमारतींची मंत्री श्री. भोसले यांनी  पाहणी केली व माहिती जाणून घेतली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी  यावेळी  येथील सभागृहाची वर्तमान  असलेली 300 आसन क्षमता वाढवून 500 करण्याची मागणी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच यासंदर्भात रीतसर प्रस्ताव  विभागाकडे  पाठवण्यात यावा असे, मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. येथील संपूर्ण कामाची सद्य:स्थिती जाणून घेत त्यांनी आवश्यक सूचना केल्या तसेच नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत येथील कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी, मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते सारथी इमारत परिसरात आपट्याच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed