• Fri. Sep 11th, 2026

गोंडवाना विद्यापीठाच्या भविष्यातील गरजा ओळखूनच आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 11, 2026

नागपूर, दि. ११ : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन परिसराची रचना करताना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा तसेच विद्यापीठाच्या भविष्यातील गरजा ओळखून त्यानुसार गोंडवास्तू कला व आधुनिक शैलीचा संगम असलेला परिसर विकसित करण्याला प्राधान्य द्या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठासाठी १८६ एकर जागेत शैक्षणिक संकुल तसेच प्रशासकीय इमारत व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करण्याच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने , अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण वास्तु विशारद जगन्नाथ तावडेकर, विद्यापीठाचे अभियंता जितेंद्र अंबागडे, उमेश राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

गडचिरोली परिसरात औद्योगिक विकासाला पोषक वातावरण निर्माण होत असतानाच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व संशोधन उपक्रमांनाही प्रोत्साहन मिळणार आहे , या दृष्टीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यापीठाची इमारत गोंड वास्तुकलेचा वारसा जपतानाच आधुनिक शैलीचा संगम असावा , त्या दृष्टीने देशातील व राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक परिसर असलेल्या इमारतींच्या अभ्यास करून त्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट परिसर विकसित करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.

गोंडवाना विद्यापीठ १८६ एकर जागेत विकसित करण्यात येत असून यासाठी सत्तावीस लाख चौरस फूट जागेची उपलब्धता झाली आहे , हा संपूर्ण परिसर शैक्षणिक व संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिसरात विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करताना पर्यावरणाच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध असावा. या परिसराच्या विकासासाठी १ हजार १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे . त्यापैकी केंद्र व राज्य शासनातर्फे १५७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

यावेळी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी विद्यापीठाची इमारत बांधताना या परिसरातील निसर्गाशी एकरूप असणारी व अत्याधुनिक सुविधा असलेली इमारत असावी अशी सूचना केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने यांनी विद्यापीठ परिसरात संकुल विकसित करताना येथील विद्यार्थ्यांसाठी सुविधा शैक्षणिक उपक्रम संशोधन आदींचा समावेश असलेली सुंदर इमारत बांधण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. विद्यापीठाचा परिसर विकसित करताना वास्तूशैलीचा अभ्यास करूनच त्याप्रमाणे मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
या परिसरात पर्यावरण पूरक हरित इमारत ऊर्जा बचत विविध सत्तावीस शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या इमारती कृत्रिम पाणवठे सहा कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता वनौषधी उद्यान व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात प्राधान्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed