• Wed. Jun 10th, 2026

    Pune Crime: अतिशहाणपणा पुण्यातील तरुणीच्या अंगलट; PSI बनून डॉक्टरला फसवायला गेली अन् स्वत:च अडकली, एका चुकीने बिंग फुटलं

    Pune Crime: अतिशहाणपणा पुण्यातील तरुणीच्या अंगलट; PSI बनून डॉक्टरला फसवायला गेली अन् स्वत:च अडकली, एका चुकीने बिंग फुटलं

    Pune Crime: ही घटना शनिवारी (सहा जून) सकाळी सुमारे दहाच्या सुमारास व्हिक्टरी थिएटरसमोरील संजीवन स्किन क्लिनिकमध्ये घडली.

    तोतया पीएसआय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: त्वचारोग तज्ज्ञांकडे लवकर नंबर मिळवण्यासाठी स्वतः पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून खाकी वर्दी परिधान करणाऱ्या तरुणीचा बनाव कॅम्प परिसरात उघडकीस आला आहे. वर्दीवरील नावाची पाटी (बॅच) चुकीच्या बाजूने लावल्यामुळे संबंधित डॉक्टरला संशय आला आणि चौकशीत ती तोतया पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    समिना आफिस इनामदार ऊर्फ समिना पठाण (वय २५, रा. म्हाळुंगे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस फौजदार महेश भगवान शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

    Maharashtra TimesPune Rave Party: पुण्यात ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा; तुळापूर येथील फार्महाउसवर पहाटेपर्यंत धिंगाणा, 78 जणांवर गुन्हा
    लष्कर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे काही कामानिमित्त संबंधित क्लिनिकमध्ये गेले होते. त्या वेळी समिना इनामदार या खाकी वर्दी परिधान करून तेथे आल्या. मात्र, त्यांच्या गणवेशावरील नावाची पाटी नियमानुसार उजव्या बाजूला असणे अपेक्षित असताना ती डाव्या बाजूला लावलेली होती. त्यामुळे शिंदे यांना संशय आला.

    ड्युटीवरून आल्याचा बनाव

    संबंधित महिलेने शिंदे यांच्याकडे येऊन डॉक्टरांकडे आपला नंबर लावून देण्याची विनंती केली. त्यानंतर शिंदे यांनी त्यांना त्या कोणत्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी आपण बाणेर पोलिस ठाण्यात कार्यरत असून, रात्रपाळीची ड्युटी पूर्ण करून थेट क्लिनिकमध्ये आल्याचे सांगितले.

    Maharashtra TimesPune Crime : पुण्याच्या वेशीवर हाऊस पार्टीचे कल्चर, पोलिसांपासून वाचण्यासाठी कमालीची गुप्तता, फक्त 5 तास आधी लोकेशन जाहीर
    त्यामुळे बळावला संशय
    त्यांच्या उत्तरातील विसंगतीमुळे संशय अधिक बळावला. यानंतर शिंदे यांनी लष्कर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून संबंधित महिलेची अधिक चौकशी केली. चौकशीदरम्यान ती कोणत्याही पोलिस विभागात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले; तसेच ती खोटी ओळख सांगून पोलिस उपनिरीक्षक असल्याचा बनाव करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शिंदे यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

    पोलिसात भरती होण्याची इच्छा अपूर्ण
    प्राथमिक चौकशीत समिना बारावी उत्तीर्ण असल्याचे समोर आले आहे. तिला पोलिस दलात भरती होण्याची इच्छा होती. मात्र, ते शक्य झाले नसल्याने खाकी वर्दीविषयी आकर्षण निर्माण झाले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे; तसेच संजीवन स्किन क्लिनिकमध्ये उपचारासाठी रुग्णांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून लवकर नंबर मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी खाकी वर्दीचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी समिना इनामदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा