• Thu. Jul 30th, 2026
    Dilip Walse Patil : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

    गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरु असतानाच आज दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी भेटीचं कारण सांगितलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडी आणि भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी जात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. या प्रश्नावर स्वत: दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भूमिका मांडली.

    “आजची भेट ही कुठल्याही प्रकारे राजकीय भेट नव्हती. रयत शिक्षण संस्था संदर्भातील काही प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी पूर्वनियोजित बैठक होती. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, रामशेठ ठाकूर, विश्वजीत कदम आणि मी असे आम्ही उपस्थित होतो. गुरुपौर्णिमादेखील आहे. शरद पवारांना फुलं देऊन, त्यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. विशेषत: रयत शिक्षण संस्थेबाबत चर्चा झाली. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही आणि होण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही”, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी सुरुवातीला दिली.

    “राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारे झालेली नाही. त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. गुरुमंत्र काही नसतो. काम करत राहा. लोकांसाठी काम करा. चांगलं काम करा हाच त्यांचा नेहमीचा मंत्र आहे”, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

    दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यावेत असं वाटतं का?

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “उगाच एखाद्या विषयाला फाटे फोडायचं कारण नाही. गुरु आहेत. गुरुस्थानी आहेत. नेहमीच मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. ते आजपर्यंत आम्ही सगळ्यांचे घेत आलो. जसे मी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले, तसे भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी चाललेलो आहे”, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का?

    यावेळी पत्रकारांनी पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “त्याबद्दल मला काही माहिती नाही. आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते आपल्याशी बोलतील. असे आहे की, कुणी कुठेही राजकीयदृष्ट्या असलं तरी शेवटी राजकीय कार्यक्रम हा वेगळा असतो आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात”, असं वळसे पाटील म्हणाले.