Major Industrial Boost for Maval: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत मावळ तालुक्यात ११०० एकरांवर नवी एमआयडीसी उभारण्यात येत आहे. अनेक जमिनींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. भूसंपादनालाही सुरुवात झाली आहे. यामुळे रोजगारासाठी मोठी संधी निर्माण होणार आहे.
तीन गावांतील १,१०० एकर जमीन संपादित होणार
मावळ तालुक्यातील बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या गावांच्या हद्दीत ही एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. एकूण १,१०० एकर क्षेत्र या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये बऊर आणि करंज परिसरातील सुमारे ५०० एकर, तर ब्राह्मणवाडीतील ६०० एकर जमिनीचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कोरडवाहू जमिनींची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Pune Water Cut: औंध ते वारजे, पुण्यातील ‘या’ भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित, पुढील दोन दिवसही परिणाम
२००७ पासून प्रक्रिया सुरू
उद्योग विभागाने २००७ मध्ये बऊर एमआयडीसीसाठी जागा अधिसूचित केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये या परिसरातील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले. आता सर्वेक्षण आणि मोजणीचे काम पूर्ण झाल्याने प्रत्यक्ष भूसंपादनाच्या हालचालींना वेग आला आहे.
एमआयडीसीकडून भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
एकरी किंमत ८४ लाखांपर्यंत
सध्या या परिसरातील जमिनीची प्राथमिक किंमत एकरी सुमारे ८४ लाख रुपये निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात संबंधित विभागांची संयुक्त बैठकही पार पडली आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच अधिक वेगाने राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नवीन औद्योगिक केंद्र विकसित होण्यास मदत होणार असून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सध्या देशात विकासाचे पर्व सुरु आहे, असे म्हटले जाते, त्याचा फायदा आता पुणेकरांच्याही वाट्याला येतोय, असे या प्रकल्पाचे समर्थन करणारे नागरिक म्हणत आहेत.
