• Sat. Jun 6th, 2026

    Raigad Water Supply : रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर; 73 गावे, 258 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा

    Raigad Water Supply : रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर; 73 गावे, 258 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा

    रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियोजनाने 1.31 लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून 73 गावे, 258 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. पेण आणि महाड सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे असल्याची माहिती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या झळा आणि तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. 1 जून 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 70 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 73 गावे आणि 258 वाड्यांतील तब्बल 1 लाख 31 हजार 99 नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले सर्व टँकर खासगी स्वरूपाचे असून शासकीय अथवा मदत स्वरूपातील कोणताही टँकर कार्यरत नाही. पाणी टंचाईची सर्वाधिक तीव्रता पेण तालुक्यात दिसून येत असून येथे 9 गावे आणि 76 वाड्यांसाठी 12 टँकरद्वारे 24 हजार 746 नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

    महाड तालुक्यात 14 गावे आणि 98 वाड्यांमधील 27 हजार 620 नागरिकांना 9 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पनवेल तालुक्यात 10 गावे आणि 8 वाड्यांसाठी 9 टँकर कार्यरत असून 18 हजार 553 नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. कर्जत तालुक्यात 13, खालापूरमध्ये 6 आणि माणगावमध्ये 5 टँकर कार्यरत आहेत.

    याशिवाय अलिबाग, उरण, सुधागड-पाली, रोहा, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्येही टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. विशेषतः पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धनसारख्या ग्रामीण भागांतील नागरिकांना या व्यवस्थेमुळे मोठा दिलासा मिळत आहे.

    जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद पाणी टंचाईग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने ठेवली असून नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

    राज्यात पाऊस कधीपर्यंत येण्याची शक्यता?

    दरम्यान, राज्यात 10 जूनपर्यंत तरी पावसाची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत पेरणी करु नये, असं आवाहन केलं आहे. राज्याच्या मान्सूनवर एल निनो अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनची एन्ट्री उशिराने होणार असल्याची माहिती आहे. एल निनोचा प्रभाव कमी झाला तर राज्यात चांगला पाऊस पडू शकतो. पाऊस पडत नाही तोपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाची मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा