• Fri. Jun 5th, 2026

    Accident News: पती-पत्नी बाईकवरून जाताना भयंकर घटना; डोळ्यात कचरा गेल्याचं निमित्त अन् क्षणात सगळं संपलं, मयुरीसोबत नेमकं काय घडलं?

    Accident News: पती-पत्नी बाईकवरून जाताना भयंकर घटना; डोळ्यात कचरा गेल्याचं निमित्त अन् क्षणात सगळं संपलं, मयुरीसोबत नेमकं काय घडलं?

    Kolhapur News: शासनाच्या नियमांनुसार रस्त्यालगतच्या विहिरींसाठी संरक्षक भिंत, चेतावणी बोर्ड असणे अनिवार्य असते, ज्याची अंमलबजावणी येथे झाली असती, तर ही दुर्घटना टळली असती अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

    पती-पत्नी बाईकवरून जाताना भयंकर घटना; डोळ्यात कचरा गेल्याचं निमित्त अन् क्षणात सगळं संपलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: कोल्हापुरात एका महिलेचा रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. ही महिला दुचाकी चालवताना फक्त डोळ्यात कचरा गेल्याचं निमित्त झालं आणि तिचा तोल गेला. याचवेळी काळाने घाव घालत या महिलेला आपल्या पती आणि मुलांपासून दूर लोटले. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथे ही दुर्घटना घडली आहे.

    दर्याचे वडगाव येथे रविवारी रात्री सुमारे आठ वाजता घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण गाव हादरले आहे. गावातील डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघालेल्या मयुरी विशाल बेनके (वय 30 वर्षे) या विवाहितेचा दुचाकीसह विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर तिचे पती विशाल बेनके यांचा जीव कसाबसा वाचला. या अपघाताची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात झाली असून सहायक फौजदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

    डॉक्टरांकडे जाण्याचा प्रवासच ठरला शेवटचा

    मयुरी बेनके यांची तब्येत बरी नसल्याने त्या रविवारी रात्री घरातून निघाल्या होत्या. त्या स्वतःच दुचाकी चालवत होत्या आणि पती विशाल हे दुचाकीवर मागे बसले होते. घरापासून अवघ्या 300–400 मीटर अंतरावर असलेल्या विलास मगदूम यांच्या मालकीच्या विहिरीजवळ अचानक वाऱ्यामुळे वाहून आलेला कचरा मयुरी यांच्या डोळ्यात गेला. त्यामुळे त्यांच्या दुचाकीवरील ताबा क्षणार्धात सुटला आणि दोघेही पती पत्नी थेट विहिरीत कोसळले.

    विहीर खोल असल्यामुळे तसेच रात्रीच्या अंधारात अस्पष्ट दिसत असल्याने विशाल यांच्यासाठी पत्नीला वाचवणे अशक्य ठरले. त्यांनी तातडीने विहिरीतून बाहेर येऊन आरडाओरडा करून जवळच असणाऱ्या घराकडे धाव घेतली आणि घटना गावकऱ्यांना कळवली. तातडीने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ आणि युवकांनी बचाव कार्य सुरू केले. रूपेश बेनके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांत अर्ध्या तासानंतर मयुरी यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला.

    या अपघाताची नोंद इस्पुर्ली पोलिसात दाखल झाली असून पोलीस पाटील रमेश माळी यांनी फिर्याद नोंदवली आहे. प्राथमिक तपासात हा अपघात डोळ्यात अचानक कचरा जाऊन दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर विहिरीची रचना, रस्त्याकडील किनारा, खोली आणि रात्रीच्या प्रकाशाची व्यवस्था यांची नोंद केली आहे.

    कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    मयुरी यांच्या पश्चात पती विशाल, दोन लहान मुली, सासू–सासरे आणि दीर असा परिवार आहे. दोन लहान मुलींच्या आणि पतीच्या भविष्यासाठी उभी असलेली मयुरी ही तरुण महिला होती. डॉक्टरांकडे जाताना आपल्या आईवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे आता मुलींच्या डोक्यावरील आईचे छत्र कायमचं हरपलं आहे. या लहान मुलींच्या भविष्याचा विचार करून ग्रामस्थ आणि नातेवाईक यांच्याकडून हळहळ व्यक्त होत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा