प्रशांत किशोर यांनी मुंबईत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. आता स्वत: पार्थ पवार यांनी या भेटीबाबत खुलासा केला आहे.
प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे चाणक्य? पार्थ पवारांनी चर्चा खोडल्या, मुंबईतील भेटीचा तपशीलही सांगितला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय वादळ निर्माण झाले असून अंतर्गत कलहाची चर्चा रंगत आहे. याच कलहातून नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीकडून पक्षाने रणनीती आखण्याचे काम काढून घेतल्याचं बोललं जात आहे. अशातच काल जनसुराज पक्षाचे नेते आणि राजकीय सल्लागार म्हणून देशाला परिचीत असणाऱ्या प्रशांत किशोर यांच्यासोबत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची बैठक झाल्याने आगामी काळात राष्ट्रवादीचे सल्लागार म्हणून ते काम पाहतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ते माझे चांगले मित्र असून काल ते मुंबईत असल्याने आमची भेट झाल्याचा खुलासा पार्थ पवार यांनी केला आहे.
प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या बैठकीवर स्पष्टीकरण देताना पार्थ पवार यांनी म्हटलं आहे की, “प्रशांत किशोर हे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करणार असल्याचा अंदाज काही लोकांकडून बांधला जात आहे. त्यामुळे मी यावर स्पष्टीकरण देत आहे. माझ्या माहितीनुसार, राजकीय सल्लागार म्हणून काम करणं किशोर यांनी काही वर्षांपूर्वीच थांबवलं आहे. त्यामुळे यात ते बदल करतील असं मला वाटत नाही. मात्र ज्यांना याबाबतीत जाणून घेण्यास रस आहे, अशा लोकांना मी एक गोष्ट खात्रीने सांगतो की, जिथं आवश्यकता असेल तिथं आम्ही एकमेकांसाठी कायम उपलब्ध आहोत आणि यापुढेही राहू,” असं पार्थ यांनी स्पष्ट केलं आहे.
“प्रशांत किशोर हे माझे मित्र असून असून ते माझ्यासाठी भावासारखे आहेत. त्यांची आणि आमची ओळख ही अजितदादा हयात होते, तेव्हापासूनची आहे. प्रशांत किशोर हे काल मुंबई शहरात होते त्यामुळे आमची आणि त्यांची भेट झाली. आम्ही एकत्र जेवण केलं आणि यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयांवर चांगली चर्चा झाली,” अशी माहितीही पार्थ पवार यांनी दिली आहे.
आयपॅक राष्ट्रवादीसोबत काम करणार?
प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार म्हणून काम करणं सोडलं असलं तरी त्यांच्याच नेतृत्वात उभी राहिली I-PAC ही कंपनी देशभरात विविध राजकीय पक्षांसोबत अजूनही काम करत आहे. मी आता या कंपनीशी संबंधित नाही आणि आता राजकीय सल्लागार म्हणून कामही करत नाही, असा दावा किशोर यांच्याकडून केला जातो. मात्र नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतही प्रशांत किशोर यांनी थलपती विजय यांच्या पक्षाची निवडणूक रणनीती ठरवण्यास मदत केली होती. त्यामुळे प्रशांत किशोर हे थेटपणे राष्ट्रवादीसोबत काम न करता त्यांनी आधी ज्या कंपनीचे नेतृत्व केलं आहे त्या I-PAC ची राष्ट्रवादीकडून मदत घेतली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा