Shivraj Motegaonkar: लातूरमधील RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर NEET पेपरप्रकरणात CBIच्या ताब्यात आहेत. शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास, RCCचे नेटवर्क आणि आता पेपरफुटी प्रकरणातील आरोप यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ‘लातूर पॅटर्न’ची मोठी ओळख आहे. याच शहरातून उभ्या राहिलेल्या RCC क्लासेसने गेल्या काही वर्षांत मोठे नेटवर्क तयार केले. NEET आणि JEE परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणारा विश्वासार्ह क्लास अशी RCCची प्रतिमा तयार करण्यात आली होती. मात्र आता याच क्लासचे नाव पेपरप्रकरणात समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
४२ प्रश्न परिक्षेत आले
CBIच्या २८ अधिकाऱ्यांच्या पथकाने लातूरमध्ये दाखल होत शिवराज मोटेगावकर यांची तब्बल आठ ते दहा तास चौकशी केली. चौकशीदरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्याने अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले. RCCच्या गेस पेपरमधील तब्बल ४२ प्रश्न NEET परीक्षेत आल्याचा दावाही तपासादरम्यान चर्चेत आला आहे.
शेतकरी कुटुंबातला जन्म
शिवराज मोटेगावकर यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. पुढील शिक्षणासाठी ते लातूरला बहिणीकडे राहायला आले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
Shivraj Motegaonkar: 23 एप्रिललाच मोटेगावकरकडे होता नीटचा पेपर! CBI तपासात कोणते मिळाले पुरावे?
होम ट्युशनने सुरुवात
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी होम ट्युशन सुरू केली होती. घरखर्च आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ते विद्यार्थ्यांना शिकवत होते. पुढे उमरगा आणि लातूरमधील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
खासगी कोचिंगमध्ये शिकवणी
यानंतर त्यांनी ‘रेणुकाई कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून खासगी शिकवणी सुरू केली. सुरुवातीला केवळ केमिस्ट्री विषय शिकवणारे मोटेगावकर यांनी पुढे सर्व विषय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना राबवली. त्यातूनच RCC पॅटर्नचा विस्तार झाला.
RCCचे नेटवर्क
गेल्या दोन दशकांत RCCने महाराष्ट्रात मोठे नेटवर्क उभे केले. लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि इतर शहरांमध्ये RCCच्या शाखा सुरू झाल्या. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण आणि आक्रमक जाहिरातींच्या माध्यमातून RCCने आणखी विस्तार केला. आजघडीला या संस्थेमार्फत कोट्यवधींची उलाढालही होत असल्याची चर्चाही होत आहे. दरम्यान, NEET निकालांमध्ये मोठे यश मिळाल्याचे दावे करत क्लासेसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
CBIकडून सखोल तपास
आता मात्र याच RCCचे नाव NEET पेपरप्रकरणात समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे संबंध आहेत, किती विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचली आणि या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास CBIकडून सुरू आहे.
