• Sat. Sep 5th, 2026

Third Mumbai Railway Network:तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाला वेग आलेला आहे. तिसऱ्या मुंबईत रेल्वेजाळे विस्तारणार असून विस्तारीकरणाच्या आराखड्याचे काम एमआरव्हीसी कडून सुरू झाले आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
महेश चेमटे, मुंबई : तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाला वेग आलेला असतानाच सर्वसामान्यांच्या जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासासाठीही वेगवान हालचाली सुरू आहेत. भविष्यात या विकासकेंद्रात वाढणारी प्रवासीसंख्या गृहित धरून उपनगरी रेल्वेचे जाळे विस्तारण्याचा आराखडा तयार केला जात आहे. एमयूटीपी ४ प्रकल्पसंचात नव्या मुंबईला थेट लोकल जोडणी देण्यासह ४० नव्या स्थानकांत सुधारणा करण्यात येणार आहे. लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी महामुंबईसाठी कवच ५.०सह आधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

एक्स्प्रेस वाहतुकीचे विभाजन अभ्यास

भविष्यातील दोन दशकांतील महामुंबईचा विस्तार आणि प्रवासी यांची गरज लक्षात घेऊन मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून ( एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ( एमयूटीपी ) ४ या प्रकल्पसंचाची निर्मिती करण्यात येत आहे. यात नव्या मार्गिका, विद्यमान मार्गांचा विस्तार, जलद-धीम्या लोकलसाठी स्वतंत्र मार्ग, उपनगरी आणि मेल-एक्स्प्रेस वाहतुकीचे विभाजन यांचा अभ्यास केला जाणार आहे. महामुंबईचा व्यापक वाहतूक अभ्यास (सीटीएस) २०२१ यांसह मंजूर आणि प्रस्तावित वाहतूक प्रकल्पांचा हा यात समावेश असेल.

पश्चिम रेल्वे आणि राज्य सरकार यांच्याशी समन्वय

मुंबई ३.० मधील कर्नाळा-साई-चिरनेर (केएससी) शहरांसह नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) यांना सध्याच्या लोकल जोडणीचा विस्ताराची चाचपणी करण्यात येईल. एमआरव्हीसीसह मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि राज्य सरकार यांच्याशी समन्वय साधून प्रकल्प निश्चित करण्यात येतील.

आर्थिक आणि वित्तीय व्यवहार्यतेचे मूल्यांकन

त्यानंतर प्रकल्पांचे सविस्त प्रकल्प अहवाल ( डिपीआर ) तयार केले जातील. यात प्रकल्प खर्चाचा अंदाजासह आर्थिक आणि वित्तीय व्यवहार्यतेचे मूल्यांकन केले जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या स्थानक सुधारणा आणि पुनर्विकास प्रकल्पांमधील रेल्वे स्थानके वगळून सुमारे ४० उर्वरित उपनगरीय स्थानकांच्या सुधारणांची शक्यता तपासण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नवे रेल्वे टर्मिनस

एमयूटीपी-४च्या नियोजनातील महत्त्वाचा भाग म्हणजे सन २०३०, २०३५, २०४० आणि २०४७ या वर्षांसाठी भविष्यातील उपनगरीय रेल्वे प्रवासी मागणीचे मूल्यांकन करणे हा आहे. यात प्रवाशांची प्रवास पद्धत ते नवे रेल्वे टर्मिनस उभारणे अशा सर्व बाबींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

अतिरिक्त लोकल मार्गिका

मुंबईतील प्रवासी गर्दी लक्षात घेता लोकल फेऱ्या वाढवणे आणि दोन लोकलमधील अंतर कमी करण्यासाठी कवच ५.० सह अद्ययावत सिग्नलिंग यंत्रणा उभारणे, लोकल उभ्या करण्यासाठी अतिरिक्त मार्गिका, लोकल देखभाल सुविधा वाढ अशा यंत्रणा सुधारणांचाही आढावा प्रकल्पसंचात घेतला जाणार आहे.

Maharashtra TimesKDMC Hospitals: अद्याप केडीएमसी रुग्णालयांच्या फायर ऑडीट मधील त्रुटी तशाच ; मुहूर्त काही सापडेना

‘शून्य मृत्यू’साठी उपाययोजना

रेल्वे मंत्रालयाचे ‘मिशन झिरो डेथ’ साठी रेल्वे स्थानकांवर प्रवेश नियंत्रण व्यवस्था लागू करण्याची व्यवहार्यता आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचाही विचार केला जाईल. प्रवासी सुविधा, फलाटांची क्षमता, प्रवाशांची सुरक्षित आणि सुलभ वाहतूक, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी सुलभता तसेच विविध वाहतूक साधनांमधील समन्वय यांचा आढावा घेतला जाणार आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा