मालेगाव, दि. ५ (उमाका): भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन हा गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संस्कार, कर्तव्यभावना, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. आई-वडिलानंतर गुरुजनांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान करावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त शालेय शिक्षण विभाग, पंचायत समिती मालेगाव मार्फत शिवगंगा लॉन्स, दाभाडी येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री भुसे बोलत होते. यावेळी मालेगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील, विस्तार अधिकारी तथा वैज्ञानिक दृष्टीकोन समिती अध्यक्ष अमोल निकम, मालेगाव तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा, आजी-आजोबांचा आणि गुरुजनांचा आदर करावा. शाळेत आल्यानंतर शिक्षकांना मान-वंदना देण्याची संस्कृती निर्माण झाली पाहिजे. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणारे नसून समाजाची भावी पिढी घडविणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच त्यांना आवश्यक त्या सुविधा व सहकार्य देण्याची शासनाची भूमिका आहे. मालेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत केलेली कामगिरी विशेष कौतुकास्पद असून जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात दहावा क्रमांक मिळविला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची फी भरण्यास आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना आता जिल्हा परिषद सेस निधीतून फी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा चौथी व सातवीच्या स्तरावर घेतली जात होती. त्यानंतर ती पाचवी व आठवीच्या स्तरावर घेण्यात येत होती. अनेक शाळांची रचना पहिली ते चौथी तसेच पहिली ते सातवी अशी असल्याने विद्यार्थ्यांना योग्य त्या टप्प्यावर शिष्यवृत्ती परीक्षेची संधी मिळावी, यासाठी पुन्हा चौथी व सातवीच्या स्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

‘चला, शाळेला जाऊया’ अभियानाचा शुभारंभ
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वर्षानिमित्त चला शाळेत जाऊया या अभियानाचा राज्यव्यापी शुभारंभ मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. हे अभियान दिनांक ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

यावेळी मंत्री भुसे म्हणाले, शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळेतील सकारात्मक बाबी समाजासमोर आणण्याबरोबरच ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रशासन, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी मंत्रालयापासून आयुक्तालयापर्यंतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिक्षण पालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित अधिकारी आपल्या दत्तक जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन चांगल्या कामाचे कौतुक करतील तसेच आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन व सहकार्य करतील. शाळांच्या अडचणी स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होईल. मालेगाव तालुक्यातील शाळांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आरओ फिल्टरची सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळांच्या गरजेनुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १३ हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध होणार आहेत. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, त्या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिकूल परिस्थितीतही समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत.

आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक केशव गावित यांच्या कार्याचा उल्लेख करताना मंत्री भुसे यांनी त्यांच्या समर्पित वृत्तीचे कौतुक केले. शाळा ही केवळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांची नसून संपूर्ण गावाची जबाबदारी आहे. शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे काम केल्यास शाळांचा सर्वांगीण विकास साधता येतो. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. शासकीय शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता व क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येईल. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या दृष्टीने शिक्षण विभाग काम करीत आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या हिताचा निर्णय लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेण्यात येईल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा झाला सन्मान
मालेगाव गटात सन-२०२६ मध्ये पुढील प्रमाणे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक पात्र झाले. इयत्ता ४ थी – २२९ विद्यार्थी, इयत्ता ५ वी – १३५ विद्यार्थी, इयत्ता ७ वी – २०३ विद्यार्थी, इयत्ता ८ वी – ११५ विद्यार्थी असे एकूण ६८२ विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पात्र ठरले असून ही संख्या ही नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील अव्वलस्थानी आहे. इयत्ता ४ थी व ५ वी तील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ५०००/- असे तीन वर्षासाठी मिळतील तर इ. ७ वी व ८ वी तील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रु. ७५००/- असे पुढील तीन वर्षासाठी मिळणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात गुणवंत विद्यार्थांचा व शिक्षकांचा सन्मान मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात मालेगाव गटात सन २०२४-२५ मध्ये पुढील प्रमाणे बक्षीस पात्र शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात आले

१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौळाणे (गा.) – प्रथम – रु.३,००,०००/-
२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघट – द्वितीय- रु.२,००,०००/-
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंजारवाडी- तृतीय – रु.१०००००/-
इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा
१) जय हिंद इंग्लिश मेडि. स्कूल दाभाडी – प्रथम – रु.३,००,०००/-
२) शिव संस्कार इंग्लिश मेडि. स्कूल टेहरे – द्वितीय- रु.२,००,०००/-
३) श्री. जी. वाय. पाटील माध्यम, विद्यालय, जळगाव (नि) – तृतीय- रु.१०००००/-
यावेळी विद्यार्थींनी लावण्या निकुंभ, जि.प.शाळा, अजंग, गुणवंत शिक्षक वैभव वाघ, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज हिरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
०००