• Sat. Jun 6th, 2026

    विदर्भातील प्रवास सुस्साट होणार! 547 किमी लांबीच्या महामार्गांना मंजुरी; कसे-कुठे असतील मार्ग?

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2026
    विदर्भातील प्रवास सुस्साट होणार! 547 किमी लांबीच्या महामार्गांना मंजुरी; कसे-कुठे असतील मार्ग?

     

    नागपूर
    विदर्भातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने या भागात 4 मुख्य महामार्गांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सर्व प्रकल्पांची पाहणी करण्याचे आणि लवकरात लवकर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सर्व मार्ग एकूण 547 किमी लांब असून एकूण 51,906 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

    बुधवारी (दि. 13 मे 2026) मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतीखाली झालेल्या एका बैठकीत या चारही प्रकल्पांना मंजुरी मिळाली. हे सर्व महामार्ग महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे बांधण्यात येणार आहेत. 2028च्या सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत हे महामार्ग प्रवाशांसाठी खुले करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

    पहिला महामार्ग – नागपूर ते चंद्रपूर

    या चारही प्रकल्पांपैकी सर्वात लांब महामार्ग म्हणजे नागपूर ते चंद्रपूर महामार्ग. हा मार्ग 204.79 किमी लांब असून नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमधील 9 तालुक्यांना जोडणार आहे. हा महामार्ग 4 पदरी असून यावरती 7 इंटरचेंज असतील. 2,159 हेक्टर भूखंडावर हा संपूर्ण महामार्ग बांधण्यात येणार आहे.

    दुसरा महामार्ग – नागपूर ते गोंदिया

    नागपूर ते गोंदिया महामार्ग राज्यातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा 162,37 किमी लांब महामार्ग सहा पदरी असून यावरती 9 इंटरचेंज प्रस्तावित आहेत. एकूण 1,634 भूखंडावर हा महामार्ग बांधण्यात येईल.

    तिसरा महामार्ग – भंडारा ते गडचिरोली

    भंडारा ते गडचिरो महामार्ग 94.24 किमी लांबीचा मार्ग असेल. हा महामार्ग भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमधून प्रस्तावित आहे. 1,185 भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या हा महामार्ग सहा पदरी असून यावरती सहा इंटरचेंज असतील.

    चौथा महामार्ग – नावेगाव मोर-कोनसरी ते सुरजागड मार्ग

    चौथा आणि शेवटचा महामार्ग चंद्रपूर आणि गडचिरोली सीमेवर असलेल्या नावेगाव मोरला गडचिरोलीतील कोनसरी आणि पुढे गडचिरोलीतील सुरजागडापर्यंत जोडेल. चंद्रपूर आणि गडचिरोलीला जोडणारा हा एक महत्त्वाचा महामार्ग असेल. एकूण 289 हेक्टर भूखंडावर या चार पदरी मार्गाचं बांधकाम होईल. हा महामार्ग मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गाला जोडणार आहे.

    चारही प्रकल्पांचा एकूण बांधकाम खर्च 32,478 कोटी रुपये अपेक्षित असून एकूण प्रकल्प खर्च 51,906 कोटी रुपये आहे. या अतिरिक्त खर्चामध्ये भूसंपादन, उपयुक्तता आणि इतर सहाय्यक खर्चाचा समावेश आहे. दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या बोगद्याचा अभ्यास करून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.


     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed