Weather Update: राज्यात सध्या उत्तरेकडील राज्यांकडून उष्ण वारे येत असल्यामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. निरभ्र आकाशामुळे सूर्याची तीव्रताही अधिक जाणवत असून तापमानाने उच्चांक गाठला आहे.
सोमवारी मुंबईतील तापमान
मुंबईच्या विविध केंद्रांवरील नोंदीनुसार राम मंदिर येथे सोमवारी ३९.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान पोहोचले होते. विक्रोळी येथे ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वांद्रे येथे ३७.३, दहिसर येथे ३७.१ तर विद्याविहार येथे ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवरील कमाल तापमानापेक्षा अधिक होते. सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सोमवारी अनुक्रमे ३५.८ आणि ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
Mumbai News: मुंबईतील पहिल्या भुयारी बोगद्याचं खोदकाम वेगात; 250 मीटर काम पूर्ण; मध्य-पश्चिम रेल्वे आणि मेट्रोखालून मार्ग
सांताक्रूझ येथे २.२ तर कुलाबा येथे १.५ अंशांनी सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक होते. सोमवारी वातावरणातील आर्द्रता वाढल्याने किमान तापमानही चढे होते. सांताक्रूझ येथे २८ तर कुलाबा येथे २७.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. त्यामुळे मुंबईकरांना सध्या रात्रीच्या वेळीही अस्वस्थता जाणवत आहे. त्यामुळे रात्रीची झोपही निवांत होत नसल्याचे मुंबईकरांचे निरीक्षण आहे. दुपारच्या वेळी काही वेळ वाऱ्याची झुळूक जाणवली, मात्र ही झुळूकही उष्म्याचीच जाणीव करून देत होती. अलिबाग येथे सोमवारी ३८.२ तर डहाणू येथे ३७.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान भारतीय हवामान विभागाकडून नोंदले गेले.
उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट
प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार १२ मे ते १५ मे या दरम्यान कोकणामध्ये वातावरण कोरडे असेल, तर उष्णतेचा इशारा सध्या तरी नाही. मात्र धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जिल्ह्याचा घाट परिसर येथे मंगळवारी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते. याचा परिणाम उत्तर कोकणातील काही भागांवर होऊ शकतो.
पुण्यात तापमानाने उच्चांक गाठला
पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी, सोमवारी तापमानात वाढ होऊन दिवसभरात कमाल ४१.६ आणि किमान २४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. दहा वर्षांतील मे महिन्यात नोंदवले गेलेले हे उच्चांकी तापमान ठरले आहे. वाढलेल्या किमान तापमानानेही या हंगामाचा विक्रम मोडला आहे.
मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने पुणेकरांना आता पूर्वमोसमी पावसाचे वेध लागले असताना, शहरात सध्या उष्णतेच्या लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात तीन दिवसांपासून सरासरीच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविण्यात येते आहे. गेल्या आठवड्यात सकाळी ऊन आणि दुपारी आकाश ढगाळ होते; त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवली नाही. हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने दिवसा आणि रात्रीचा उकाडा वाढला होता. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे सरासरीपेक्षा तापमान वाढल्याचे स्पष्टीकरण भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे.
सोमवारीदेखील सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढली होती.
Mumbai Coastal Road: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग! उत्तर मुंबईतील प्रवाशांना फायदा होणार; 10 टप्प्यांत कसा बांधणार मार्ग?
चार दिवस पावसाची शक्यता नाही
दुपारी रस्त्यावर उन्हाचे चटके आणि उष्णतेचा दाह जाणवला. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्येही हेच चित्र होते. सूर्यास्तानंतरही गरम हवा होती. रात्रीही उकाडा वाढत गेल्याने नागरिक वैतागले होते. पुढील चार दिवस पावसाची शक्यता नाही, त्यामुळे वाढलेल्या उन्हाची दखल घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ‘आयएमडी’ने केले आहे.
“राज्यात सध्या उत्तरेकरील राज्यांकडून उष्ण वारे येतआहेत. हवेतील आर्द्रताही कमी झाली आहे. निरभ्र आकाशामुळे सूर्याची तीव्रता अधिक जाणवते आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ झाली आहे, पुढील दोन दिवस हेच वातावरण कायम राहील,” असे आयएमडीचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांचे मत आहे.
