NCRB Report 2024: ‘एनसीआरबी’ च्या अहवालानुसार, देशातील १९ महानगरांमध्ये २०२४मध्ये महिला अत्याचाराचे एकूण ५० हजार ५८४ गुन्हे नोंदवले आहेत.
देशातील २० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या १९ महानगरांमध्ये पुण्यात अशा २४४ गुन्ह्यांची नोंद झाली असून, दिल्ली, जयपूर, मुंबई आणि हैदराबादनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या आकडेवारीमुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
२०२३च्या तुलनेत हे प्रमाण १.६ टक्क्यांनी घटले असले, तरी महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या अद्याप चिंताजनक आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये पती किंवा नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाच्या घटना सर्वावाधिक आहेत. अशा १४ हजार ३७६ घटना नोंदविल्या आहेत. त्याखालोखाल महिलांचे अपहरण आणि पळवून नेण्याचे १० हजार १४२ गुन्हे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ७हजार ५०८ गुन्हे आणि महिलांच्या विनयभंगाच्या उद्देशाने हल्ल्याचे ४,६७१ गुन्हे नोंदविले आहेत.
Baramati News: बारामतीत आता नवे दादा; अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत जय पवारांचा जनता दरबार; नागरिकांची मोठी गर्दी
महानगरनिहाय महिला आणि मुलांविषयक लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दिल्ली शहर अव्वल असून, तेथे १,०८९ गुन्हे नोंदले गेले आहेत. जयपूरमध्ये ४९७, मुंबईत ४११, हैदराबादमध्ये ३५८ आणि पुण्यात २४४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल इंदूरमध्ये १९५, बेंगळुरूमध्ये १६८, लखनौमध्ये १६१ आणि नागपूरमध्ये १३६ गुन्हे नोंदविले आहेत.
‘स्वारगेट’ घटनेमुळे सुरक्षेवर प्रश्न
शहरात गेल्या दोन वर्षांत घडलेल्या काही धक्कादायक घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. २०२४मध्ये बोपदेव घाट परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरभर संताप व्यक्त केला होता. निर्जन भागांतील सुरक्षा, रात्रीची गस्त आणि महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर २०२५मध्ये स्वारगेट एसटी बस स्थानकातील बसमध्ये एका प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या प्रवासी स्थानकांपैकी एक असलेल्या स्वारगेटमध्येच अशी घटना घडल्याने सुरक्षाव्यवस्थेवर तीव्र टीका झाली होती. या दोन्ही घटनांनंतर महिला सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी विविध स्तरांतून करण्यात आली होती.
Pune Parvati Case : ‘तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून न्यायचे…’ पुण्यातील पर्वती प्रकरणातील चिमुकलीने आई-वडिलांना सांगितली आपबिती
शहरे आणि २०२४मधील बलात्काराचे दाखल गुन्हे
दिल्ली शहर- १,०८९
जयपूर- ४९७
मुंबई- ४११
हैदराबाद- ३५८
पुणे- २४४
इंदूर- १९५
बेंगळुरू- १६८
लखनौ- १६१
नागपूर- १३६
कानपूर- १११
