• Sat. Jun 6th, 2026
    Kolhapuri Chappal: ‘कोल्हापुरी’ची करकर जगभरात! सामंजस्य करारानंतर 40 स्टोअरमध्ये चप्पलांची विक्री

    Kolhapuri Chappals Goes Global: महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आता जागतिक लग्झरी उत्पादन ठरली असून ‘मेड इन इंडिया’ची ताकद महाराष्ट्राने जगासमोर प्रभावीपणे सादर केली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    कोल्हापुरी चप्पल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनुराग कांबळे, मुंबई : पारंपरिक कोल्हापुरी चप्पलांची करकर आता जगभर अभिमानाने गुंजणार आहे. मागील वर्षी प्राडाने या चपला आपल्या स्प्रिंग कलेक्शनचा भाग असल्याचा दावा केल्यानंतर राज्यभरात निषेधाचा सूर उमटला होता. त्यानंतर राज्य सरकारने प्राडा कंपनीशी संपर्क साधत चपलांविषयी आणि त्याच्या पारंपरिक बांधणीविषयी माहिती दिली होती. त्यानंतर कंपनीने थेट राज्य सरकारबरोबरच सामंजस्य करार करत ही कला जगभर नेण्यासाठी कारागिरांना प्रशिक्षित करण्याचे ठरविले होते. त्यानुसार, कारागिरांनी तयार केलेल्या चपला मंगळवारपासून प्राडाच्या जगभरातील ४० स्टोअरमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

    कोल्हापुरी चपला या केवळ या जिल्ह्यापुरत्या नव्हे तर देशभरात पोहोचल्या आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनच राज्यातील कारागीर या चपलांची बांधणी वर्षानुवर्षे करत असून या भागातील कारागिरांकडून तयार करण्यात येणाऱ्या चपला या सर्वोत्तम मानल्या जातात. परंतु, जून २०२५ मध्ये इटलीच्या प्राडा या कंपनीने पुरुषांसाठी आपले स्प्रिंग/समर कलेक्शन सादर केले. या फॅशन शोमध्ये मॉडेलने परिधान केलेल्या चामडी सँडल्सची रचना महाराष्ट्रातील पारंपरिक आणि जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलप्रमाणे अत्यंत साम्य दर्शवणारे असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर सामाजमाध्यमांवर व पारंपरिक कारागीर समूहांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

    Maharashtra TimesRaj Thackeray : ‘मारणं हा उपाय आहे का? मग काय लिहिणं हा उपाय आहे?’, मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं वक्तव्य
    अखेर प्राडा कंपनीने राज्य सरकारशी संपर्क साधून याविषयी परस्पर सहकार्य करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर प्राडाच्या प्रतिनिधी मंडळाने कोल्हापूरला भेट देत कारागिरांशी संवाद साधला. चर्चेनंतर डिसेंबर २०२५ मध्ये मुंबईतील इटलीच्या वाणिज्य दूतावासात लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग) आणि प्राडा यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार, प्राडा पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३०० कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. हे प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी येथे दिले जाईल. त्यापैकी सर्वोत्तम ३० कारागिरांना इटलीतील प्राडा अकादमीमध्ये प्रगत प्रशिक्षणाची संधीही मिळणार आहे.

    या करारांतर्गत तयार झालेल्या चपला मंगळवारपासून जगभरातील प्राडाच्या ४० स्टोअर्समध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

    Maharashtra TimesMLC Election: चर्चेशिवाय निर्णय! काँग्रेस ठाकरेंवर नाराज; सुंदोपसुंदीनं राऊतांची गोची, माजी होण्याची भीती
    पारंपरिक कलेला आधुनिक प्रशिक्षणाची जोड
    पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या कारागिरीला आधुनिक डिझाइन आणि तांत्रिक कौशल्यांची जोड देण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात येणार आहे. तसेच, या प्रशिक्षणामध्ये डिझाइन, तांत्रिक कौशल्ये, डिजिटल साधने आणि बाजारपेठेतील ट्रेंड्स यांचा समावेश असणार आहे. यामुळे पारंपरिक कौशल्य जपत कारागिरांना आधुनिक बाजारपेठेसाठी सक्षम करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे शतकानुशतके जपल्या गेलेल्या कोल्हापुरी चप्पल परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत स्थापन झालेल्या लिडकॉमने (संत रोहिदास चर्मउद्योग) पारंपरिक कारागिरीची ओळख जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोल्हापुरी चप्पलांना २००९ मध्ये भौगोलिक निर्देशांक (जीआय) दर्जा मिळवून देण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा