• Sat. Jun 6th, 2026
    Mumbai-Pune Expressway Missing Link Rule : कारला 100 ते प्रवासी वाहनांना 80 किमी प्रति तास वेगमर्यादा, सरकारकडून नियमावली जारी

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तयार करण्यात आलेल्या नव्या मिसिंग लिंकने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे मिसिंग लिंक येत्या 1 मे पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. पण त्याआधी प्रशासानकडून याबाबत महत्त्वाची नियमावली जारी करण्यात आली आहे. नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक तयार करण्यात आली आहे. या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांना घाटातून प्रवास करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच प्रवाशांचा जवळपास अर्ध्या तासांचा प्रवास वाचणार आहे. या मिसिंग लिंकमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटणार आहे. याशिवाय प्रदूषणदेखील कमी होणार आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मिसिंग लिंकच्या कामांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी हा अभियांत्रिकीचा एक चमत्कार असल्याचं म्हटलं होतं. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील हे मिसिंग लिंकचं येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी उद्घाटन होणार आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर हे मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मिसिंग लिंकच्या उद्घाटनाला दोन दिवस बाकी असतानाच राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार, कोणकोणत्या गाड्यांना या मिसिंक लिंकने प्रवास करता येईल, तसेच या मिसिंग लिंकने प्रवास करताना कोणकोणत्या गोष्टी पाळाव्यात? याबाबत माहिती देण्यात आली आहे. याबाबत एक नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या नोटीफिकेशनमध्ये काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.

    नोटीफिकेशनमध्ये काय? वाचा A टू Z

    “यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, सदर मार्ग ०१ मे २०२६ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. मिसिंग लिंक बोगद्यामधील वाहतूक सुरक्षा, तांत्रिक बाबी आणि स्टेकहोल्डर्स सोबत झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक सुरक्षिततेसाठी या मार्गावरील वाहतुकीचे टप्याटप्याने नियमन करणे आवश्यक आहे. त्याअर्थी मोटर वाहन अधिनियम, १९८८ चे पोट कलम ११२ (२) सोबत अधिसूचना क्र. एम. व्ही.ए. ०५८९/सीआर-१०६१ टीआरए २, १९/०५/१९९० आणि महाराष्ट्र शासन राजपत्रामधील प्रसिद्ध करण्यात आलेले असाधारण, भाग चार-अ, परिशिष्ट, दिनांक ३०/०९/२००२ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून मी, प्रविण साळुंके, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील “मिसिंग लिंक” प्रकल्पासाठी खालीलप्रमाणे वाहतूक नियमन अधिसूचना निर्गमित करीत आहे.”

    अ) टप्याटप्याने वाहतूक अंमलबजावणी : कोणकोणत्या वाहनांना प्रवासाची मान्यता?

    प्रथम टप्पा : (दिनांक ०१/०५/२०२६ ते ३१/१०/२०२६)
    केवळ हलकी मोटार वाहने (LMV) व बसेस / प्रवासी वाहने (Buses & Passengers Vehicles)
    मालवाहू वाहनांना प्रवेश नाही.

    द्वितीय टप्पा : (दिनांक ०१/११/२०२६ पासून)
    हलकी मोटार वाहने (LMV) व बसेस / प्रवासी वाहने (Buses & Passengers Vehicles)
    सुरूवातीच्या सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर मालवाहू वाहनांना परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

    विशेष निर्बंध :
    धोकादायक माल (HAZ-MAT): ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील “मिसिंग लिंक” या मार्गावर पूर्णतः बंदी असेल. अशा वाहनांनी आस्तित्वातील द्रुतगती मार्गाचा वापर करावा.

    क) वेग मर्यादा : बोगद्यामधील वेगमर्यादा हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी प्रति तास निश्चित करण्यात येत आहे. तसेच बसेस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी प्रति तास करण्यात येत आहे.

    …तर कारवाई होईल

    या अधिसूचनेमध्ये निर्दिष्ट केलेल्या महत्तम वेगापेक्षा वाहनाची गती ५ टक्के पर्यंत अधिक आढळून आल्यास मोटार वाहन अधिनियम, १९८८ कलम १८३ अन्वये दखल घेण्यात येऊ नये. सदरची अधिसूचना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मुंबई यांचेकडून अधिकृतपणे सामान्य प्रवासासाठी/वाहतूकीसाठी ज्या दिवशी सुरू केला जाईल त्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यत लागू राहील.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा