• Mon. Jun 15th, 2026

    Pod Taxi: ‘बीकेसी’नंतर ठाणे आणि मिरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचा विस्तार, 72 स्थानकं, मेट्रोला जोडणार; कुठे-कसे असतील मार्ग?

    Pod Taxi: ‘बीकेसी’नंतर ठाणे आणि मिरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचा विस्तार, 72 स्थानकं, मेट्रोला जोडणार; कुठे-कसे असतील मार्ग?

    Thane Pod Taxi: ठाणे आणि मिरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचा विस्तार होणार आहे. MMRDA हा प्रकल्प राबवत असून 2028पर्यंत पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: मुंबईतील प्रवास सुखद आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी सुरु करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. राज्य सरकार बीकेसी नंतर पॉड टॅक्सी नेटवर्कचा विस्तार करणार आहे. मुंबईसह ठाणे, मिरा भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी धावणार आहे. पॉड टॅक्सी लहान असल्यामुळे वर्दळ आणि वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये ही फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पहिल्यांदा या तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

    MMRDAसोबत प्रकल्प

    मुंबई व उपनगरात हळूहळू पॉड टॅक्सीला फर्स्ट व लास्ट माइल कनेकटीव्हीटी साठी प्राधान्य दिलं जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर राबवले जाणार आहे. राज्य सरकार एमएमआरडीए सोबत मिळून या प्रकल्पाचं काम करणार आहे. MMRDA ही नोडल एजन्सी असेल. सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून त्यावरून अभ्यास करून ठाणे आणि मिरा भाईंदर परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.या अहवालात ठाणे शहरात 43.5 किमी लांब पॉड टॅक्सी नेटवर्क प्रस्तावित आहे. त्याशिवाय मिरा भाईंदरमध्ये 32.5 किमी लांब नेटवर्क तयार करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. टप्प्याटप्प्याने या प्रकल्पांचे काम केले जाणार आहे. प्रत्येक 1 किमी अंतरावर पॉड टॅक्सीचे स्थानकं प्रस्तावित आहेत. त्याशिवाय नव्या मेट्रो मार्गांशी हे स्थानकं जोडलेले असतील.

    ‘मेट्रो’ला जोडणार

    ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव म्हणाले, “या मार्गाच्या व्यवहार्यतेवर गेल्या पाच महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.” “ठाणे रिंग मेट्रोसह सुमारे 30 किमी मेट्रो लाइन येत आहे, आम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की पीआरटीचा मार्ग एकत्रपणे नेटवर्क तयार करेल. पुढील दोन आठवड्यांत मार्ग आणि आर्थिक मॉडेलवर औपचारिक निर्णय घेतला जाईल.” त्याशिवाय मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले की, डीपीआर तयार झाल्यानंतर एमएमआरडीएकडे अंमलबजावणीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

    स्थानकं कुठे असतील?

    ठाणे पॉड टॅक्सी शहरातील माजिवाडा, विवियाना/लेक शोअर मॉल, मानपाडा, हिरानंदानी इस्टेट, कासाररवडवली, तीन हात नाका आणि शास्त्री नगर या महत्त्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2.806 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या 43.5 किमी मार्गावर तब्बल 72 स्थानकं असतील. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीला उतारा मिळणार आहे.

    दरम्यान, मिरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचे एकूण 29 स्थानकं असतील. या 32.5 किमी लांब नेटवर्कसाठी 2,256 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग मिरा रोड, भाईंदर, काशीमिरा, गोल्डन नेस्ट सर्कल, शांती पार्क, कनकिया आणि इतर रहिवासी ठिकाणांना जोडणार आहे. या पॉड टॅक्सीच्या पहिल्या टप्प्यात 12 – 13 किमी लांब मार्ग विकसित करण्यात येणार आहे. हा टप्पा 2028पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.

    कशी असेल पॉड टॅक्सी?

    ही पॉड टॅक्सी एलिव्हेटेड मार्गावर धावणार आङे. प्रत्येक टॅक्सीमध्ये सेल्फ-स्टिअरिंर प्रणाली असेल, त्यामुळे ड्रायव्हर-विना ही टॅक्सी धावणार आहे. प्रत्येक पॉड-कारमध्ये 16 ते 20 प्रवाशांना पोहोचवण्याची क्षमता आहे. या टॅक्सीमध्ये 8 प्रवासी बसून तर इतर प्रवासी उभं राहून प्रवास करू शकतात. ही टॅक्सी ताशी 60 ते 70 किमी वेगाने प्रवास करेल. प्रत्येक दिशेने तासाला हजारो प्रवासी प्रवास करू शकतात. सध्या भाडे दर प्रत्येकी 8 ते 10 रुपये असण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा