• Sat. Jun 6th, 2026
    32 वर्षीय पत्नीचे शिक्षकाशी अनैतिक संबंध, 45 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, संपत्तीसाठी छळाचा आरोप

    Nagpur Police ends life : दोन वर्षांपासून पत्नीचे शिक्षकासोबत अनैतिक संबंध आहेत. याची पोलीस पतीला माहिती मिळाली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : संपत्ती व घटस्फोटासाठी होणारा मानसिक छळ असह्य झाल्याने पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्याची अखेर केली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मृत पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    शीलरत्न भीमराव बेलेकर (वय ४५, रा. वाघदरा, इसासनी), असे मृताचे नाव आहे. ते प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तर पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) व तिचा प्रियकर महेश मेश्राम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    घटस्फोट व संपत्तीची मागणी

    पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आरोपी महेश हा शिक्षक आहे. दोन वर्षांपासून रुचिकाचे महेशसोबत अनैतिक संबंध आहेत. याची शीलरत्न यांना माहिती मिळाली. त्यानंतर रुचिका या शीलरत्न यांना घटस्फोट व संपत्तीची मागणी करून त्यांचा मानसिक छळ करू लागल्या. ‘तू मरून जा’ असे त्या नेहमी शीलरत्न यांना म्हणायच्या. महेशही त्यांना त्रास द्यायचा.

    तलावात बॉडी सापडली

    फेब्रुवारीत शीलरत्न हे त्यांचा भाऊ अजय भीमराव बेलेकर (वय ४९, रा. कामगार कॉलनी) यांच्याकडे आले. काही वेळाने ते घरून निघाले. त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. अजय यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात शीलरत्न बेपत्ता असल्याची तक्रार दिली. २४ फेब्रुवारीला अंबाझरी तलावात शीलरत्न यांची बॉडी आढळून आली.

    दोघांवर जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा

    या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांनी तपास केला. तपासादरम्यान रुचिका व महेश या दोघांच्या छळाला कंटाळून शीलरत्न यांनी जीव दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

    दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये टेंभापुरी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. प्रिन्स आशेर श्रीसुंदर (वय १९, रा. छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे धरणात पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    हा तरुण मित्रांसोबत टेंभापुरी धरणात पोहण्यासाठी आला होता. या वेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. येथील धरणात मुबलक पाणी आहे. उकाड्यामुळे परिसरासह शहरातून तरुण मोठ्या प्रमाणात पोहण्यास येत असतात. या ठिकाणी धरणावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने; तसेच धरणात गाळ उपसा केल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पोहणाऱ्यांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मित्रांसोबत पोहत असलेल्या प्रिन्सचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

    या वेळी घटनेची माहिती मिळाल्यावर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक नागरिक व मित्रांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत टोलनाक्याजवळील सीएसएमएसएस रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

    या धरणात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या ठिकाणी पोहण्यासाठी येणाऱ्या तरुणांना प्रतिबंध करावा अशी मागणी करण्यात आली होती. या धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेट बसवून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा अशी मागणी नांदूर मध्यमेश्वर येथील कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ढोले यांनी दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा