Mla Rohit Pawar On Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करणाऱ्या बागेश्वर बाबांच्या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते आणि रोहित पवारांच्या इशाऱ्याला काय उत्तर मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“शिवरायांनी थकल्यामुळे…”
धीरेंद्र शास्त्री यांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगताना दावा केला की, “शिवरायांनी थकल्यामुळे राजपाट सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यावर रामदास स्वामींनी तो मुकूट पुन्हा महाराजांच्या डोक्यावर ठेवून, ‘हे राज्य माझे आहे आणि तुला फक्त त्याचे संचालन करायचे आहे’, असे सांगितले.” इतिहासाचा कोणताही आधार नसलेले हे विधान समोर आल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वीही तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलींबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या बागेश्वर बाबांनी आता थेट शिवछत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे.
रोहित पवारांची बंदीची मागणी
या प्रकरणावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “शिवराय थकले होते, असे म्हणणारा हा भोंदू महाराष्ट्रात पुन्हा दिसता कामा नये,” अशा शब्दांत त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. “छत्रपतींचा अवमान होत असताना राज्यातील बडे नेते त्याच व्यासपीठावर असतानाही शांत कसे बसले?” असा सवाल करत, बागेश्वर बाबावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
AAP Crisis : आपमध्ये भूकंप, ठाकरेंची साथ न सोडणारे संजय राऊत कडाडले; भाजप, राघव चड्ढांसह फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतला
रोहित पवारांचं ट्वीट जसंच्या तसं
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं.
दरम्यान, आता या वादामुळे आगामी काळात बागेश्वर बाबांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
