• Sat. Jun 6th, 2026
    तुला डिजिटल अरेस्ट करतोय, पिंपरीतील तरुण फसला, 12 लाख द्यायला निघाला, 80 वर्षीय वडिलांची जागरुकता, भामट्यांचा डाव उधळला

    Pimpri Digital Arrest avert : २७ तास चाललेल्या या प्रकारात आरोपींनी तरुणाचे बँक खाते आणि आधार कार्डाची माहिती मिळवली. तसेच ‘क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्यासाठी बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. भीतीपोटी तरुणाने आपल्या म्युच्युअल फंडमधून १२ लाख रुपये काढण्याची तयारी केली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाला ‘ डिजिटल अरेस्ट ’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी फसवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघड झाला आणि तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक टळली.

    भामट्यांचा तरुणाला फोन

    मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाला व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे अज्ञात इसमाने संपर्क साधला. समोरील व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचमधील अधिकारी असल्याचे भासवले. त्याने तरुणाच्या नावावर एक पार्सल पकडण्यात आल्याचे सांगत, त्या पार्सलमध्ये पाच पासपोर्ट आणि एमडी अंमली पदार्थ आढळल्याचा दावा केला.

    व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी

    “तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागेल,” असे सांगून तरुणाला भीती दाखवण्यात आली. पुढे ‘सिग्नल’ अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी सुरु करण्यात आली. कॉलदरम्यान पोलिस वर्दीत असल्याचे भासवणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगत, कोणालाही माहिती देऊ नये अशी धमकी दिली.

    २७ तासांची चौकशी

    सुमारे २७ तास चाललेल्या या प्रकारात आरोपींनी तरुणाकडून त्याचे बँक खाते आणि आधार कार्डची माहिती मिळवली. तसेच ‘क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. या भीतीपोटी संबंधित तरुणाने आपल्या म्युच्युअल फंडमधून १२ लाख रुपये काढण्याची तयारी केली होती.

    Eknath Shinde यांनी पहलगाम हल्ल्यातील शहीदासाठी बांधलं घर, कुटुंबियांनी मानले आभार

    सावध वडिलांचा पोलिसांना फोन

    दरम्यान, तरुणाने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्यांच्या वडिलांनी तत्काळ सावधगिरी बाळगत निगडी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार सोपन बोधवड यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. सोपन बोधवड, मुकुंद वारे आणि महिला पोलिस अंमलदार स्नेहा मस्के यांनी पीडिताच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या पत्नीला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे हा ‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार उघडकीस आला आणि मोठी आर्थिक फसवणूक टळली.
    Maharashtra TimesPune News : बाबा माझी परीक्षा घेतायत का? आंबे खरेदीवरुन कौस्तुभ गनबोटेंच्या लेकाचा प्रश्न, आई निरुत्तर; वर्षभरानंतरही दुःखाची छाया

    जनजागृती मोहिमेचा फायदा

    पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेमुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकांना या प्रकाराची जाणीव झाली आणि त्यांनी वेळीच पोलिसांशी संपर्क साधला, असे त्यांनी सांगितले.
    Maharashtra TimesBengaluru Crime : तुला वेस्टर्न स्टाईल प्रपोज करणारे, घरी कोणी नसताना ‘प्रेमाने’ बोलावलं, बेडला बांधलं; किरण फसला, प्रेयसीने जिवंत पेटवलं

    नागरिकांसाठी आवाहन

    ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. कोणताही पोलिस अधिकारी व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाही. अशा प्रकारचे कॉल किंवा संदेश आल्यास घाबरून न जाता तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच आपल्यासोबत सायबर फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा