Supriya Sule Baramati Speech : सुनेत्रा वहिनींना मतदान करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली असल्याचं भावनिक आवाहन सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांना केलं आहे. प्रचाराच्या सांगता सभेला त्या उपस्थित होत्या. यावेळी केलेल्या भाषणात त्यांचा कंठ दाटून आला.
बारामती लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. यावेळी उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेसाठी सुप्रिया सुळे बारामतीत पोहोचल्या होत्या. व्यासपीठावर बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं . दादांच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्याने संपूर्ण सभेत भावनिक वातावरण पाहायला मिळाले.
“काकींना भेटले, पण सभेचं सांगू शकले नाही…”
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी पुण्याहून येत असताना काटेवाडीला आशा काकींना भेटायला गेले. काकी टीव्ही बघत होत्या. त्यांना मी काय सांगू की मी इथे प्रचारासाठी आले आहे? मी फक्त एवढंच सांगितलं की इंदापूरला गेले होते, तिथून येताना तुम्हाला भेटायला आले. त्यांना सांगायची हिम्मतच झाली नाही. दादांच्या जाण्याने कुटुंबावर आणि बारामतीवर जे दुःख कोसळलंय, त्यातून सावरणं सोपं नाही.”
Nashik TCS Case: व्हॉट्सअॅप चॅटमध्ये तपास अधिकाऱ्यांना काय-काय सापडलं? नाशिकच्या TCS प्रकरणात नवीन माहिती
“काळजाचा थरकाप उडवणारा दिवस”
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सकाळी ५ वाजता पार्थचा फोन आला. तो म्हणाला डॅडींचं प्लेन पडलंय. माझा विश्वासच बसत नव्हता. आजही डोळे बंद केले की तो प्रसंग समोर येतो. मला वाटत होतं दादा विमानात नसेलच, आणि असला तरी तो सुखरूप चालत बाहेर येईल. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आज तो कर्ता पुरुष आपल्यात नाही, हे दुःख आयुष्यभर काळजात राहील.”
“बारामतीचा रेकॉर्ड आणि वहिनींना साथ”
बारामती आणि पवार कुटुंबाच्या नात्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “मागच्या सहा दशकांपासून बारामतीकरांनी पवार साहेबांना साथ दिली आहे. या देशात सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा मान बारामतीकरांमुळे साहेबांना मिळणार आहे. हीच परंपरा दादांनी पुढे चालवली. आता ही जबाबदारी वहिनींवर आणि पार्थ-जयवर आली आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
“एक नंबरचं बटण दाबा”
“ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा होती. पण आता मतदान होत आहे. ईव्हीएमवर एक नंबरला सुनेत्रा वहिनींचे नाव आणि चिन्ह आहे. त्या एक नंबरच्या बटणावर शिक्कामोर्तब करा. ते बटण दाबून दादांना खरी आदरांजली वाहा, हीच माझी तुम्हाला विनंती आहे.”, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
