Satara News : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील येरफळे येथे पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत नवदाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या १० दिवसांतच संसाराची स्वप्नं धुळीस मिळाल्याने सडादाढोली गावावर शोककळा पसरली आहे.
नवदाप्मत्याचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यात राजू झोरे (वय 25) आणि राणी झोरे (वय 23, रा. सडादाढोली, ता. पाटण) हे नवदाम्पत्य ठार झाले. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. नातेवाईकाच्या लग्नाला जाताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच नियतीने त्यांना हिरावून नेल्याने पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
नेमका कसा झाला अपघात?
पाटण पोलिसांकडून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सडादाढोली गावचे राजू झोरे आणि राणी झोरे हे दहा दिवसांपुर्वीच विवाहबद्ध झाले होते. सोमवारी त्यांच्या नातेवाईकाचे शिराळा (जि. सांगली) येथे लग्न होते. त्यासाठी दुचाकीवरून ते निघाले होते. येरफळे (ता. पाटण) गावच्या हद्दीत ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पुढचे चाक निखळून पडले तर पिकअप गाडीच्या काचेचा चक्काचूर झाला आहे.
राजू जागेवर गेला तर पत्नी राणीने वाटेतच प्राण सोडला
या भीषण अपघातात पती राजू हा जागीच ठार झाला तर पत्नी राणी ही गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी कराडला नेत असताना वाटेतच तीचा मृत्यू झाला. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यामुळे नवऱ्या मुलीच्या हातावरची मेहंदी आणि नवऱ्याच्या अंगाची हळदही उतरली नव्हती. तोच काळाने या दाम्पत्यावर झडप घातली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या हृदयद्रावक अपघाताची बातमी समजताच सडादाढोली गावावर शोककळा पसरली.
घरच्यांचा आक्रोश
दरम्यान, ज्या घरात दहा दिवसांपूर्वी मंगलमय वातावरणात होते, त्याच घरातील आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकत होता. नवदाम्पत्याचे पार्थिव पाहून उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा