Dombivli father viral video : डोंबिवलीत माणुसकी हरवली की काय असा प्रश्न पडतो आहे. कारण की, दीड वर्षांच्या लेकीला कडेवर घेऊन तब्बल १०० रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करूनही एकाही रिक्षावाल्यांनं एका पित्याला प्रतिसाद दिला नाही.
डोंबिवलीत दीड वर्षांच्या मुलीला घेऊन बापाची रिक्षासाठी वणवण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
डोंबिवली: डोंबिवलीच्या रस्त्यांवर रिक्षाचालकांच्या मुजोरीचा कळस गाठला असून, एका बापाची आपल्या दीड वर्षांच्या लेकीला कडेवर घेऊन झालेली ससेहोलपट पाहून संपूर्ण शहर हळहळत आहे. बाजीप्रभू चौकातील या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राजकीय वातावरणही तापलं असून, मनसेने थेट परिवहन मंत्र्यांना साकडं घातलं आहे.
नेमकी घटना काय?
डोंबिवली एमआयडीसी परिसरात राहणारे दर्शन परब शनिवारी रात्री आपल्या पत्नी आणि दीड वर्षांच्या चिमुकलीसह बाहेर पडले होते. रात्री ८.३० च्या सुमारास बाजीप्रभू चौकातून त्यांना टिळकनगरकडे जायचे होते. दीड वर्षांची मुलगी खांद्यावर घेऊन दर्शन यांनी रिक्षा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी चक्क १०० हून अधिक रिक्षांना हात दाखवला, पण एकाही मुजोर रिक्षावाल्याला पाझर फुटला नाही. तासन् तास रस्त्यावर उभं राहूनही रिक्षा न मिळाल्याने दर्शन यांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला संताप व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडला.
राजू पाटलांचे परिवहन मंत्र्यांना साकडं
या घटनेनंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना टॅग केले आहे. पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, “दादा, तुम्ही पूर्वाश्रमीचे डोंबिवलीकर आहात. कधी काळी तुम्हीही इथे रिक्षा चालवली आहे, त्यामुळे इथल्या वेदना तुम्हाला ठाऊक आहेत. आज तुम्ही परिवहन मंत्री झालात याचा सार्थ अभिमान आहेच, पण सध्या इथल्या वाहतूक व्यवस्थेचे पार तीनतेरा वाजले आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील कारभारावर प्रश्न
राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रशासनावर टीका केली आहे. कल्याण-डोंबिवलीतील परिवहन नियोजन हे अत्यंत थर्ड क्लास असून राजकीय भाई-दादांच्या वरदहस्तामुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. परिवहन मंत्र्यांनी स्वतः एकदा शहरात येऊन या व्यवस्थेची झाडाझडती घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
नागरिकांचा संताप अनावर
दर्शन परब यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, नेटिझन्सनी डोंबिवलीतील रिक्षावाल्यांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी हक्काचं वाहन म्हणून ओळखली जाणारी रिक्षा जर अशा वेळी मिळत नसेल, तर आरटीओ प्रशासन झोपलंय का? असा सवाल आता विचारला जात आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा