• Sun. Jun 14th, 2026

    जिद्द आणि प्रशिक्षणाची जोड: पालघरच्या वनीता उराडे यांचा नर्सरी व्यवसायातील गगनभरारी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 18, 2026
    जिद्द आणि प्रशिक्षणाची जोड: पालघरच्या वनीता उराडे यांचा नर्सरी व्यवसायातील गगनभरारी – महासंवाद

    “जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा मिळाली की यशाचे शिखर सहज सर करता येते,” हे पालघर जिल्ह्यातील रोठे (केळवा रोड) येथील सौ. वनीता विनोद उराडे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. केवळ १० वी पर्यंत शिक्षण झालेल्या वनीता ताईंनी घरची बेताची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी उचललेले पाऊल आज एका यशस्वी व्यवसायात रूपांतरित झाले असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेचे त्या एक चालते-बोलते उदाहरण बनल्या आहेत.

     

    ​सुरुवातीला शेती कामात गुंतलेल्या वनीताताईंना स्वतःचा काहीतरी स्वतंत्र व्यवसाय असावा, अशी तीव्र इच्छा होती. ही संधी त्यांना स्वयं सहायता गट (SHG) आणि ईएपी कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली. याद्वारे त्यांना ठाणे येथील ‘महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे’ची (RSETI) माहिती मिळाली. याच संस्थेत त्यांनी २३ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ‘पॉली हाऊस आणि शेड नेट शेती’ या विषयावर १० दिवसांचे सखोल प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाने त्यांच्यातील सुप्त कौशल्याला वाव दिलाच, पण त्यासोबतच आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि व्यवसाय व्यवस्थापनाचा नवा दृष्टीकोनही दिला.

    ​प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांनी वेळ न घालवता २७ फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्या स्वप्नाला मूर्त रूप दिले. सुमारे १ लाख ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी ‘वर्मी कंपोस्ट आणि नर्सरी’ व्यवसायाचा श्रीगणेशा केला. बँकिंग कर्जाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावला. आज त्यांच्या रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारची झाडे आणि उच्च दर्जाचे गांडूळ खत उपलब्ध असून, ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यामुळे त्यांचा हा व्यवसाय अल्पावधीतच स्थिरावला आहे.

    ​एकेकाळी केवळ गृहिणी आणि शेतकरी म्हणून वावरणाऱ्या वनीता ताई आज दरमहा १७ हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. केवळ स्वतःसाठी रोजगार निर्माण न करता, त्यांनी आपल्या कुटुंबाला एक भक्कम आर्थिक आधार दिला आहे. या प्रवासात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल लक्षणीय आहे; वाढलेला आत्मविश्वास, प्राप्त झालेले स्वावलंबन आणि समाजात निर्माण झालेली एक यशस्वी उद्योजिका ही ओळख त्यांच्या कष्टाचे फळ आहे. भविष्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार करून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न असून, त्यांचा हा यशस्वी प्रवास पालघरमधील शेकडो महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed