• Tue. Jun 16th, 2026
    Nagpur Heatwave : नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 18 एप्रिलला सर्व शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांनो काळजी घ्या

    नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दररोज तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. हवामान विभागाकडून उद्या नागपूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून 18 एप्रिलला शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शनिवारी, १८ एप्रिल २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’ची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

    हवामान विभागाने १८ एप्रिलसाठी नागपूर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही भागांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मार्च महिन्यापासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ४३ अंशांच्या पुढे गेला आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा कडाका अधिक जाणवत असल्याने लहान मुले, वृद्ध तसेच कामगार वर्गाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेच्या तीव्रतेपासून दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवस हवामानाचा आढावा घेऊन गरज भासल्यास आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

    दरम्यान, उष्णतेच्या वाढत्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात ‘हीट ॲक्शन प्लॅन’ लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ५६ शीतकक्ष तयार करण्यात आले असून त्यापैकी दोन उपजिल्हा रुग्णालये आणि ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शीतकक्षांमध्ये एसी किंवा हाय-स्पीड कूलर्स, मुबलक बर्फ, तसेच गंभीर रुग्णांसाठी थंड पाण्याने स्पंजिंग किंवा बाथची सोय करण्यात आली आहे.

    जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवला असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शीघ्र कृती दलही तैनात करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागालाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये सकाळच्या सत्रात वर्ग घेणे, विद्यार्थ्यांना डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी थंड पेय देणे आणि दिवसातून किमान दोन वेळा ‘वॉटर बेल’ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमार्फत दवंडी देऊन नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा आदी ठिकाणी पाणपोई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूरकरांनी उष्णतेपासून बचावासाठी सतर्क राहावे, भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे वापरावेत आणि लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा