AIMIM corporator Sahar Shaikh caste issue : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यातून ‘जायंट किलर’ ठरलेल्या आणि आपल्या ‘कैसा हराया…’ या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आता मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. सहर शेख यांनी चक्क बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे.
प्रशासकीय यंत्रणांना धोका?
कैसा हराया हा डायलॉग असलेला त्यांचा भाषणाचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावरुन राजकीय आरोप – प्रत्यारोपही वाढले होते. परंतू या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी आता प्रशासकीय यंत्रणांनाच धोका दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल केली, महाराष्ट्रातला बनावट पद्धतीचा जातीचा दाखला बनवला, अशी तक्रार त्यांच्याविरोधात आता दाखल करण्यात आली आहे. एवढचं नाही मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र तर काढलेच पण याशिवाय त्यांनी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ४ यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात आता सहर यांचं नगरसेवकपदचं धोक्यात येईल की काय असा सवाल आता उपस्थित होतो आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक ३० मधून विजयी झालेल्या सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेख हे मुळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. तक्रारदार सिद्दिकी अहमद यांच्या दाव्यानुसार, युनूस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर नियमांची पायमल्ली केली. स्थलांतरितांसाठी ‘नमुना १०’ लागू असताना, त्यांनी ‘नमुना ८’ चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आणि महाराष्ट्रातील जातीचा दाखला मिळवला. याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे पालिकेची निवडणूक लढवली.
यंत्रणांची डोळेझाक की फसवणूक?
ठाणे तहसीलदारांकडे याप्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. १८ मार्चच्या सुनावणीला युनूस शेख यांनी प्रकृतीचे कारण देत दांडी मारली, तर २३ मार्चला झालेल्या सुनावणीत तहसीलदारांनी त्यांच्या कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी काढल्या आहेत. विशेष म्हणजे, ठाण्यात राहणाऱ्या सहर शेख यांनी मुंबईतून जातीचा दाखला का काढला? यावरही आता संशयाची सुई वळली आहे. बनावट कागदपत्रांच्या जोरावर ही निवडणूक जिंकली असल्याचा ठपका तक्रारदाराने ठेवला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांशी पंगा
निवडणुकीच्या रणधुमाळीत सहर शेख आणि त्यांच्या वडिलांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडल्याने सहर शेख राज्यभर चर्चेत आल्या होत्या. मात्र, आता हा ‘विजय’ त्यांना महाग पडण्याची शक्यता आहे. जर जात प्रमाणपत्र अवैध ठरले, तर सहर शेख यांना नगरसेवक पद गमवावे लागू शकते. आता या राजकीय नाट्यात पुढे काय घडणार, याकडे संपूर्ण ठाण्याचे लक्ष लागले आहे.
