अंधेरी पश्चिम येथील आंबोली भागात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, दोन पाळीव कुत्र्यांवर अत्याचार करणाऱ्या केअरटेकरला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून आरोपीने हे अघोरी कृत्य केले, महिलने लाईव्ह फीड पाहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंधेरी पश्चिम येथील आंबोली परिसरात राहणाऱ्या एका महिलेकडे गेल्या तीन वर्षांपासून दोन पाळीव कुत्री आहेत. त्यांचा नेहमीचा कामाचा माणूस सुट्टीवर गेल्यामुळे त्यांनी ‘रंजन शाह’ नावाच्या 31 वर्षीय तरुणाला काही दिवसांसाठी केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. 7 एप्रिल रोजी संबंधित महिला काही कामानिमित्त दिल्लीला गेल्या. मात्र, घराबाहेर असूनही त्यांचं लक्ष आपल्या लाडक्या कुत्र्यांकडे होतं.
सीसीटीव्हीमुळे गुन्ह्याचा उलगडा
मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा महिलेने मोबाईलवर घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यांना काहीतरी काळंंबेरं असल्याचा संशय आला. हॉलमधील कॅमेऱ्याची दिशा जाणीवपूर्वक बदलली होती. कुत्र्यांचे वागणेही नेहमीसारखे नव्हते. त्यांनी वेळ न घालवता तातडीने मुंबईत असलेल्या आपल्या ओळखीच्या व्यक्तींना आणि शेजाऱ्यांना फ्लॅटवर जाण्यास सांगितले.
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीदरम्यान काय घडलं?
आधी बनाव, नंतर गुन्हा कबूल
महिलेचे नातेवाईक आणि शेजारी जेव्हा फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा केअरटेकर रंजन शाह याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. “मी तर फक्त कुत्र्यांशी खेळत होतो,” असा बनाव त्याने रचला. मात्र, उपस्थितांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले तोंड उघडले. त्याने लहान कुत्र्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची आणि मोठ्या कुत्र्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली.
गुन्हा दाखल
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित कुत्र्यांच्या मालकिणीने दिल्लीहून परतल्यावर आंबोली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी रंजन शाह याच्यावर ‘प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्या’च्या कलम 11 नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा विकृत मानसिकतेच्या माणसावर कडक कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून होत आहे.
