• Sat. Jun 6th, 2026
    माझ्या बाळाची चिरफाड करु नका; अन्वीकचा दारात खेळताना मृत्यू, आरती ताईंनी पोस्टमार्टम थांबवलं, जुळी बहीण कावरीबावरी

    Kolhapur Boy dies of Electric Shock : कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात आई आरती जाधव यांनी चिमुरड्याच्या बॉडीला घट्ट मिठी मारून शवविच्छेदन करण्यास तीव्र विरोध दाखवला. यावेळी आईसह नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : सध्या लहान मुले खेळत असताना अचानक कधी कोणती अघटित घटना घडेल, सांगता येत नाही. असाच एक प्रकार कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यात घडला आहे. घराच्या दारात खेळताना विजेच्या वायरला स्पर्श झाल्याने अडीच वर्षीय अन्वीक संदीप जाधव या चिमुकल्याचा बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात आई आरती जाधव यांनी पार्थिवाला घट्ट मिठी मारून शवविच्छेदन करण्यास तीव्र विरोध दाखवला. यावेळी आईसह नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. “बाळाची चिरफाड करू नका” असा आईने फोडलेला टाहो ऐकणाऱ्यांचे मन सुन्न करत होता.

    शवविच्छेदनाच्या विरोधामुळे दोन तास गोंधळ उडाला. पोलिसांच्या समजुतीनंतर रात्री दहा वाजता शेंडापार्क येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर प्रचंड मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.

    काय झालं नेमकं?

    घोटवडे (पन्हाळा तालुका) येथे संदीप वसंत जाधव हे कुटुंबासोबत राहतात. त्यांचा दोन मुली आणि एक मुलगा असा सुखी परिवार आहे. बुधवारी संध्याकाळी अन्वीक हा त्यांचा मुलगा दारात खेळत असताना अचानक त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला. तीव्र धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी तत्काळ त्याला सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र डॉक्टरांनी अन्वीकला मृत घोषित केले.
    Maharashtra TimesPune Water Park Accident : वॉटर स्लाईडवरुन घसरताना अपघात, पुण्यात 37 वर्षीय महिला गंभीर जखमी, मॅनेजमेंटची एक चूक अंगलट

    आई-नातेवाईकांचा दोन तास आक्रोश

    आरती जाधव यांनी मुलाच्या आकस्मिक निधनानंतर केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावणारा होता. पार्थिवाला घट्ट मिठी मारुन त्या रडत मुलाच्या उत्तरीय तपासणीला विरोध करत होत्या. नातेवाईकांनीही नकाराचीच भूमिका घेतली. यामुळे सीपीआरमध्ये सुमारे दोन तास गोंधळ उडाला होता. अखेर पोलिसांनी समजूत काढून रात्री 10 वाजता बॉडी शेंडापार्क येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवली.

    Kolhapur | कोल्हापुरात माहीची परंपरा, मटणाच्या वाट्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

    Maharashtra TimesDosa Batter Death : आईच्या दुधावाटे विषबाधा पसरत नाही, मग चिमुरड्या राहाचा जीव कसा गेला? डॉक्टरांची टिप, डोसा मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं

    जुळ्यांचा आनंद; आकस्मिक वियोग

    आरती आणि संदीप जाधव या दांपत्याला पहिली मुलगी झाली होती. त्यानंतर त्यांना अन्वीक आणि एक बहीण असे जुळे झाले होते. मुलगा झाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र बुधवारचा अपघात कुटुंबाला न सहन होणारा आहे. या घटनेने जाधव कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये शोककळा पसरली आहे. अन्वीकची चिमुरडी जुळी बहीणही कावरीबावरी झाली, तर आरती यांची अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा