• Sat. Jun 6th, 2026

    Nagpur Crime: कारच्या मोहापायी विद्यार्थी बनले मारेकरी! नागपुरात व्यापाऱ्याला निर्घृणपणे संपवलं, नग्नावस्थेत झुडपात फेकली बॉडी

    Nagpur Crime: कारच्या मोहापायी विद्यार्थी बनले मारेकरी! नागपुरात व्यापाऱ्याला निर्घृणपणे संपवलं, नग्नावस्थेत झुडपात फेकली बॉडी

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: कारच्या मोहापायी अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याचा निर्घृण खून केला. ही थरारक घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. गुन्हेशाखेच्या युनिट एकने या हत्याकांडाचा अवघ्या १२ तासांत छडा लावून तिघांना अटक केली.

    आर्यन नरेश शेंडे (वय २२, रा. व्यंकटेश कॉलनी, नंदनवन), रिशांख तारेश कांबळे (वय २०, रा. शिल्पा सोसायटी, बेलतरोडी) व अनुज रमेश वाघमारे (वय १९, रा. हिवरीनगर), अशी अटकेतील विद्यार्थ्यांची नावे आहेत. सुचित उपासराव भोजापुरे (वय ४४, रा. बाबा त्रिमूर्ती सोसायटी, वाडी), असे मृताचे नाव आहे. सुचित यांचा स्पेअर पार्ट पुरवठ्याचा व्यवसाय आहे. आर्यन हा बीटेकच्या कम्प्युटर सायन्सचा द्वितीय वर्षाचा तर रिशांख व अनुज हे दोघे बीटेक द्वितीय वर्षाच्या मेकॅनिकल शाखेचे विद्यार्थी आहेत. तिघेही केडीके कॉलेजमध्ये शिकतात. आर्यनची आजी पारडी चौकात राहते.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तिघांनी परीक्षा दिली. ११ वाजताच्या सुमारास आर्यनने अनुज व रिशांखला आजीकडे सोडण्यास सांगितले. तिघेही ट्रिपलसीट मोपेडने पारडीकडे जायला निघाले.

    Nagpur Crime : 14 वर्षांचा अथर्व हनुमान जयंतीच्या उत्सवात हरवला, नंतर मृतावस्थेत आढळला, डोकं चक्रावणारं प्रकरण
    वर्धमाननगर पुलावर सुचित हे एमएच-४०-बीजे-१८१० या क्रमांकाच्या कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत तिघांना दिसले. तिघेही आजीकडे गेले. ११.३० वाजता परत येताना सुचित हे कारमध्येच होते. तिघे तेथे थांबले. मदतीबाबत विचारणा केली. ‘तुम्ही मला दहा किमीपर्यंत सोडून द्या’, अशी विनंती सुचित यांनी तिघांना केली. अनुज हा मोपेडने घरी परतला. घरामागे मोपेड लावली. रिशांख, आर्यन हे कारने सुचित यांना घेऊन अनुजला घ्यायला केडीके कॉलेज परिसरात आले. अनुजला सोबत घेतल्यानंतर ते भिवापूरला गेले. कार रिशांख चालवत होता. सुचित यांनी गाडीत माल बघितला. तो चोरी गेल्याचे दिसले. त्यानंतर सुचित यांनी तिघांना वाडीला सोडून देण्याची विनंती केली. तिघे त्यांना वाडीला घेऊन यायला निघाले. याचदरम्यान आर्यनने सुचित यांच्याकडून त्यांच्या पत्नीचा मोबाइल क्रमांक घेतला. आर्यनने स्वतःकडील मोबाइलवरून सुचित यांच्या पत्नीला माहिती दिली. ‘त्यांना घरी घेऊन या’, असे त्यांच्या पत्नीने आर्यनला सांगितले.

    सायंकाळी तिघेही सुचित यांना घेऊन वाडी येथे आले. त्यावेळी सुचित यांच्या घराला कुलूप होते. आर्यनने पुन्हा सुचित यांच्या पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘त्याला घरी कशाला घेऊन आलात’, असे म्हणत सुचित यांच्या पत्नीने मोबाइल बंद केला. यावेळी रात्र झाली होती. तिघेही सुचित यांना कारने वडधामना परिसरात घेऊन गेले. सुचित मद्यधुंद असल्याने कार आपण घेऊन जाऊ, रंग बदलवून वापरू, असा मोह तिघांना झाला. तिघेही कारने त्यांना खडगाव मार्गावरील लावा स्मशान घाटाजवळील निर्जनस्थळी घेऊन गेले. दगडाने डोक्यावर सात वार करून सुचित यांचा खून केला. त्यांचे कपडे काढले. नग्नावस्थेत मृतदेह झुडपात लपवून तिघेही कार व सुचित यांच्याकडील दोन मोबाइल घेऊन पसार झाले.

    Ashok kharat case | योनी शुद्धीकरण केवळ अंधश्रद्धा, ह्याने बाळ कसं होऊ शकत नाही,लेखिका सबाने भडकल्या

    अशी उघडकीस आली घटना
    शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका नागरिकाला सुचित यांचा नग्नावस्थेत मृतदेह दिसला. त्याने वाडी पोलिसांना माहिती दिली. वाडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी खून झाल्याची माहिती मिळाल्याने गुन्हेशाखेचे उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, साहाय्यक निरीक्षक सचिन भोंडे, राजाभाऊ जाधव, साहाय्यक उपनिरीक्षक विनोद देशमुख, कुणाल गेडाम, अजमत, रवींद्र यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुचित यांच्या पत्नी वाडी पोलिस ठाण्यात धडकल्या. पती बेपत्ता असल्याचे त्यांनी वाडी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लावा स्मशानघाटाजवळ आढळलेल्या मृतदेहाचे छायाचित्र दाखविले. सुचित यांच्या पत्नीने ओळख पटवली. भेदोडकर यांनी सुचित यांच्या पत्नीकडून माहिती घेतली. केडीके कॉलेज परिसरात सापळा रचून आधी आर्यनला व नंतर अन्य दोघांना अटक करून वाडी पोलिसांच्या स्वाधीन केले.

    आर्यन वेगळा राहून करतो झोमॅटोचे काम
    आर्यनचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक तर आई प्राप्तिकर विभागात लिपिक आहे. रिशांखचे वडील शेतकरी असून अनुजचे वडील चालक आहेत. आर्यन हा भाड्याने खोली घेऊन एकटा राहतो. तो झोमॅटो डीलिव्हरी बॉयचे काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed