• Sat. Jun 6th, 2026
    22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली, खरातच्या ऑफिसात बरंच काही सापडलं; बायको देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता

    Kalpana Ashok Kharat Lookout Notice : अशोक खरातची पत्नी कल्पना हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून ती पसार झाली आहे. त्यामुळे तिच्याबाबत पोलिसांनी ‘लूकआउट’ नोटीस जारी केलेली आहे.

    रुद्राक्ष आणि हिरव्या द्रव्याचा प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : धार्मिक विधीच्या नावाखाली मंतरलेले पाणी पाजून महिलेवर वेळोवेळी अत्याचार करून तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी संशयित भोंदूबाबा अशोक खरातला जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची म्हणजेच ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे बुधवारी नाशिकरोड कारागृहात रवानगी झालेल्या खरातचा दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिस कोठडीत पाहुणचार होणार आहे.

    फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२६ या काळात खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल आहे. खरातने तिला भविष्याबद्दल भीती दाखवून वेळोवेळी कार्यालयात बोलावून घेतले. तेथे तांब्याच्या बाटलीतील ‘मंतरलेले पाणी’ पाजून वारंवार अत्याचार केला. या शोषणातून पीडिता गर्भवती राहिली. तिला जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पीडितेने खरात याच्या कृत्यांना विरोध केला तेव्हा त्याने तिला ‘तुझ्या मुलांचे बरे-वाईट होईल. तुझे वाटोळे होईल,’ अशी भीती घालून गप्प केले.

    धक्कादायक खुलासे

    पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये २२ रुद्राक्ष असलेला डबा, इंग्रजी मुळाक्षरे आणि अंक लिहिलेली एक पट्टी (काळ्या जादूसाठी वापरतात तशी), काळ्या रंगाचे भिंग आणि बाटलीमध्ये भरलेले हिरवट रंगाचे संशयास्पद पातळ द्रव्याचा समावेश असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. अघोरी कृत्यांकरिता या वस्तूंचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला.

    खरातने पीडितेकडून साडेबारा हजार रुपये घेऊन तिला एक बाटली दिली होती. त्यातील अर्धे औषध दुसऱ्या व्यक्तीला देण्यास सांगितले होते. हे औषध नेमके काय होते आणि त्याचा वापर कोणावर झाला, याचा तपास विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुरू केला आहे. खरातने केवळ पीडितेचेच नाही, तर तिच्या आई-वडिलांचे आणि भावाचेही आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो तिच्याद्वारे मागवून घेतले. या कागदपत्रांद्वारे त्याने बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले का, असा संशय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
    Maharashtra TimesPune Crime : माझ्या सायलीची बॉडीही घरी आणता आली नाही, हातही लावू शकले नाही; बारामतीतील विवाहितेला पतीने संपवलं, आत्याचा टाहो

    …म्हणून पुन्हा पोलिस कोठडी

    सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातला ‘मास्टरमाइंड’ संबोधत त्याने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. संशयिताने पीडितेवर केवळ लैंगिक अत्याचार केला नाही, तर जादूटोणा आणि अघोरी कृत्यांद्वारे तिचे मानसिक खच्चीकरण केले. पीडितेला गर्भपातासाठी दिलेल्या गोळ्या आणि बाटलीतील ‘हिरवट’ रंगाचे संशयास्पद द्रव्य नक्की काय होते? त्याचा स्रोत शोधण्यासह या गुन्ह्यात त्याला आणखी कोणी मदत केली, त्याने पीडितेची मालमत्ता हडपली का, याचा सखोल तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली. बचाव पक्षातर्फे ॲड. सचिन भाटे यांनी पोलिस कोठडीस विरोध दर्शवला.

    नाशिकच्या भोंदूबाबाला व्हिसीद्वारे कोर्टात हजर केलं, सुनावणीत काय घडलं?

    Maharashtra TimesKalpana Ashok Kharat : वयात मोठं अंतर, गरिबीतून ऐशोआरामात, सुनीताची ‘कल्पना’ झाली, माहेरशी नातं तुटलं; अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू

    खरातच्या पत्नाविरुद्ध लूकआऊट नोटीस

    खरात याची पत्नी कल्पना हिच्यावरदेखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून ती पसार झाली आहे. त्यामुळे तिच्याबाबत पोलिसांनी ‘लूकआउट’ नोटीस जारी केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घरी जाऊन तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याआधीच तिने पोबारा केला. ती देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तिला ‘लूकआउट’ नोटीस जारी केली. विमानतळ, बंदरे तसेच इतर प्रवेश-निर्गम ठिकाणी संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा