बारामती तालुक्यातील माळेगाव येथे केबल दुरुस्त करताना वीजेचा तीव्र धक्का लागून ४५ वर्षीय व्यावसायिक राहुल उर्फ पप्पू जगताप यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गारपिटीमुळे तुटलेली वायर जोडत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे माळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव परिसरात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली होती. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या केबल वाहिन्या तुटल्या होत्या. राजे अमरसिंह कॉलनी येथील केबलची वायर तुटल्याने ती दुरुस्त करण्यासाठी राहुल जगताप तिथे गेले होते. वायर दुरुस्त करण्याचे काम सुरू असतानाच अचानक त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरला. हा धक्का इतका तीव्र होता की राहुल जागीच कोसळले.
उपचारापूर्वीच मावळली प्राणज्योत
विद्युत धक्का लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने मदतीसाठी धावून येत प्रथम माळेगाव येथील रुग्णालयात नेले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी बारामतीला हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, बारामतीला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
Dombivli Crime : सांस्कृतिक डोंबिवली शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, चिमुकलीचाही विनयभंग
परिसरात शोककळा
राहुल जगताप हे माळेगाव परिसरात ‘पप्पू’ या नावाने परिचित होते. केबल व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा अनेक घरांशी जवळचा संबंध होता. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माळेगावमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ आणि वहिनी असा मोठा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी युवराज सदाशिव जेधे यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अवकाळी पाऊस आणि वीजेच्या उघड्या तारांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
