Pune rain update : पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात झाड कोसळून रंजना गिरी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांचा प्रशासनावर संताप
“एखादी घटना घडली की मगच उपाययोजना करण्याची प्रशासनाची सवय झाली आहे. अनेक वेळा पत्र देऊनही संबंधित झाड तोडण्यात आले नाही. मोठमोठ्या बंगल्यांसाठी कोट्यवधी खर्च केला जातो, मात्र सामान्य आणि गरिब नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. या निष्काळजीपणामुळेच निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
निसर्गावर कंट्रोल करू शकत नाही, महापौर
या पार्श्वभूमीवर पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाकडून आवश्यक कामे सुरू असल्याचे स्पष्ट केले. “वृक्ष छाटणीचे काम सुरू होते आणि प्रशासन आपले कर्तव्य पार पाडत आहे. मात्र, निसर्गावर कोणाचाही कंट्रोल नसतो. या दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
Pune Rain Update : हवामानाचा यू-टर्न अन् 100 मिनिटं 100 मिमीच्या कोसळधारा, कुठे झाडं कोसळली, कुठे पाणी शिरलं, तब्बल 145 तक्रारींची नोंद
महापौरांच्या या वक्तव्यानंतरही नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण नसून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांचा आरोप आहे की, जर वेळेत उपाययोजना केल्या असत्या, तर ही दुर्घटना टाळता आली असती.
महिलांनी सांगितलं थरार
सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वारे पावसाला सुरुवात झाली. आम्ही शेडमध्ये जाऊन उभे राहिलो मात्र मृत पावलेल्या रंजना नवनाथ गिरी या झाडाच्याच आडोशाला बसल्या होत्या. रंजना गिरी या फुलांची विक्री करायच्या. गेल्या विषय ते बावीस वर्षांपासून त्या यांचठिकाणी फुलविक्री करत होत्या. आज मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि वारे सुटू लागले अचानक झाड कोसळले आणि रंजना गिरी त्याखाली अडकल्या. दुर्दैवाने त्यांचा या धक्कादायक घटनेत मृत्यू झाला अशी माहिती रंजना गिरी यांच्यासोबत रोज असणाऱ्या महिलांनी दिली.
धोकादायक झाडांचा प्रश्न ऐ्रनीवर
या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा किंवा अवकाळी पावसाच्या काळात अशा घटना वारंवार घडत असल्याने, महापालिकेने केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
