Weather Update 2nd April: राज्यात मार्च महिन्यापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी झालेल्या पावासानंतर मुंबई, पुण्यावरती पावासाचे ढग दाटलेले छायाचित्र उपग्रहातून टिपले आहेत. त्यामुळे राज्यावर काही दिवस पावसाचं संकट कायम राहणार असून वाढत्या उकाड्यमध्ये काही ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत बुधवारी दुपारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी भागांत गारांसह पाऊस पडला. सकाळपासून उकाडा वाढला होता, दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पाऊस पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, गुरूवारी, 2 एप्रिल रोजी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची पुन्हा शक्यता आहे. दिवसभर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावासासह गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचं संकट कशामुळे?
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. उपग्रहातील छायाचित्रांमध्ये राज्यावर आणि विशेषतः मुंबई-पुणे परिसरांवर मोठ्या प्रमाणात ढग तयार होताना दिसून येत आहेत. सोमवारच्या वादळी पावसानंतर हे ढग दाटून आल्याचे दिसून येत आहेत. हवामान निरिक्षकांच्या माहितीनुसार, यापूर्वी उत्तर भारतावर दाटलेले ढग आता हळूहळू दक्षिणेकडे सरकत असून पश्चिम भारतात सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
या ढगांमुळे राज्यातील शहरी आणि डोंगराळ भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कल्याण-बदलापूर भागांत पावसाची शक्यता कमी असून, पुणे लोणावळामध्ये सर्वाधिक शक्यता आहे. लोणावळा आणि पुण्यातील पश्चिम घाट प्रदेशात येत्या काही दिवसांत पाऊस वाढणार आहे.
दरम्यान, या सतत होणाऱ्या पावसामुळे राज्यातील पारा खाली उतरला आहे. मार्च महिन्यात चाळीशी गाठलेले तापमान आता 32 ते 33 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. बुधवारी अमरावती जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी तापमान 38.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. दरम्यान निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून 17.8 अंश सेल्सिअस इतकं होतं.
पावसाची शक्यता
पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात थोडी वाढ होणार आहे. आकाश दुपारनंतर ढगाळ राहून संध्याकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याला भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘यलो ॲलर्ट’ जाहीर केला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा