दहा वर्षांपासून पोलिसांना चकवा देत मोकाट फिरणाऱ्या एका बड्या राजकीय चेहऱ्याला अखेर बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. बीड पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष बाबू शेठ टायरवालेला अटक केली आहे, वाचा काय आहे हे सर्व प्रकरण?
काय घडलं होतं प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण २०१६ सालातील एका प्राणघातक हल्ल्याशी संबंधित आहे. आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे एका पवन ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पावर कार्यरत असलेले मजूर अनिल म्हस्के यांच्यावर १२ जणांच्या एका टोळीने अत्यंत निर्घृणपणे आणि प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये म्हस्के गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी म्हणून बाबू सुब्रमण्यम कांबळत याचे नाव समोर आले होते.
दहा वर्षापासून होता फरार
गुन्हा दाखल झाल्यापासून कांबळत हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. या प्रकरणातील इतर ११ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी असलेला कांबळत पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर मंगळवारी अंभोरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला आणि बाबू सुब्रमण्यम कांबळत याच्या मुसक्या आवळल्या. अटकेनंतर त्याला तातडीने आष्टी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने गांभीर्य ओळखून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ladki Bahin Yojana eKYC : लाडक्या बहिणींना दिलासा! ३० एप्रिलपर्यंत करु शकतात eKYC, आदिती तटकरेंची माहिती
फरार असतानाही राजकीय कारकीर्द
या अटकेने प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, पोलीस ज्या व्यक्तीचा १० वर्षांपासून शोध घेत होते, ती व्यक्ती उजळ माथ्याने राजकारणात सक्रिय होती. फरार असतानाही कांबळत शिवसेना शिंदे गटाचा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होता. अनेक राजकीय कार्यक्रम आणि मोठ्या प्रचारसभांमध्ये तो व्यासपीठावर दिसत होता.
राजकीय वरदहस्त
फरार असतानाही मोकाट फिरणाऱ्या या नेत्याला नक्की कोणाचे अभय होते? पोलिसांना तो का दिसत नव्हता? असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. एका बाजूला पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे स्वागत होत असताना, दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला सत्तेत महत्त्वाचे स्थान कसे मिळते, यावर आता चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी उशिरा का होईना पण मुख्य आरोपीला अटक केल्याने पीडित कुटुंबाला आता न्यायाची प्रतीक्षा आहे. आगामी काळात या प्रकरणातून आणखी कोणते राजकीय लागेबांधे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
