• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai Local Video: अरे, ट्रेन आली! मुलीवरून दोन शाळकरी पोरांमध्ये वाद, थेट रुळांवर हाणामारी; मुलुंड रेल्वे स्थानकावर गोंधळ

    Mumbai Local Video: अरे, ट्रेन आली! मुलीवरून दोन शाळकरी पोरांमध्ये वाद, थेट रुळांवर हाणामारी; मुलुंड रेल्वे स्थानकावर गोंधळ

    Mulund Railway Station: समोरून येणाऱ्या ट्रेनकडे दुर्लक्ष करत मुलुंडमधील दोन पोरं थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून हाणामारी करायला लागली. यावेळी प्रवाशांना हस्तक्षेप करून हे भांडण सोडवावं लागलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई लोकलच्या मुलुंड रेल्वे स्थानकावर दोन शाळकरी मुलांचा वाद थेट रेल्वेच्या रुळांवर पोहोचला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीवरून सुरू झालेला या वादाचं रूपांतर हाणमारीत झालं असल्याची माहिती एक्स पोस्टमधून दिली गेली आहे. समोरून ट्रेन येत असतानाच ही दोन शाळकरी मुलं रुळांवर उतरून हाणामारी करायला लागल्यामुळे स्थानकावर भीतीचं वातावरण पसरलं होतं.

    नेमकं काय घडलं?

    ‘एक्स’वरती या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये हा वाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सुरू झालेला दिसून येत आहे. काही क्षणातच या वादाचं रूपांतर हाणामारीत होत असून दोघे एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत. यावेळी एका मुलाचा तोल जाऊन तो थेट रेल्वे रुळांवर पडला. मुलुंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर ही घटना घडली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

    दोघेही रुळांवर पडल्यावरही न थांबत त्यांनी भांडण सुरूच ठेवलं. यावेळी कोणतेही पोलिस, किंवा आरपीएफ आधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. शेवटी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी लोकल पाहून स्थानकांवरील नागरिकांनी मध्यस्थी केली. स्थाकावर प्रवासी “ट्रेन आ रही है” असे ओरडताना दिसत आहेत. परंतु, त्यांच्याकडे लक्ष न देताच ही पोरं एकमेकांचा गळा आवळून दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी काही नागरिक थेट रुळांवर उतरून त्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेले.

    Maharashtra TimesMumbai Local: लोकल, मेल-एक्सप्रेस खोळंबणार नाहीत! रेल्वे फाटक बंद करून पूल व बोगदे बनवणार; कल्याण-लोणावळा मार्गावर 10 उड्डाणपूल

    प्लॅटफॉर्मवर जाऊन पुन्हा वाद

    ट्रेन जवळ येताच या प्रवाशांना हस्तक्षेप करत थेट एका मुलाला उचलून रुळांवरून बाजूला केले. त्यानंतर इतर प्रवाशांनी दुसऱ्या मुलाला यशस्वीपणे सावरले व रुळावरून बाजूला आणत प्लॅटफॉर्मवर घेऊन गेले. मुलं प्लॅटफॉर्मवर पोहोचताच काही क्षणातच ट्रेन समोरून आल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुलांचे प्राण वाचले आहेत. परंतु, प्रवाशांनी हस्तक्षेप केला नसता तर या मुलांचं काय झालं असतं असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. यावेळी रेल्वे स्थानकावर कोणतेही अधिकारी किंवा पोलिस का नव्हते असा नागरिकांचा प्रश्न आहे. दरम्यान, ही दोन मुले प्लॅटफॉर्मवर जाताच पुन्हा हाणामारी करायला सुरूवात करत असतानाही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा