Pune News: गुजरातमध्ये ड्युटीवर जाण्यासाठी निघालेल्या सीआरपीएफ जवानाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबानं केली आहे. जवानाच्या अकाली निधनानं कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
– श्रीकृष्ण पांचाळ
पिंपरी- चिंचवड: पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या CRPF जवानाचा मृतदेह अखेर सापडला असून, अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत जवानाचे नाव प्रशांत प्रकाश कदम असून ते गुजरातमधील गांधीनगर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलात (CRPF) कार्यरत होते. २५ मार्च रोजी ते तळेगाव दाभाडे येथून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी गुजरातकडे रवाना झाले होते. ते प्रथम लोकलने लोणावळा येथे गेले, मात्र त्यानंतर पुन्हा तळेगावच्या दिशेने परतल्याची माहिती पुढे समोर आली. याबाबत त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही कल्पना नव्हती.
दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्याशी संपर्क तुटला. गांधीनगर येथील कार्यालयाकडूनही ते पोहोचले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांची चिंता वाढली. अखेर २७ मार्च रोजी तळेगाव पोलीस ठाण्यात प्रशांत कदम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर त्यांचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, २५ मार्च रोजीच सोमाटणे फाटा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आला आणि ‘अनोळखी’ म्हणून शवविच्छेदनही करण्यात आले. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.
मात्र, २७ मार्च रोजी बेपत्ता तक्रार दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी या ‘अनोळखी’ मृतदेहाची आणि प्रशांत कदम यांच्या वर्णनाची पडताळणी केल्याचे दिसून आले नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
३० मार्च रोजी अखेर कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि तो त्यांच्या ताब्यात देण्यात आला. जर पोलिसांनी वेळेत शहानिशा केली असती, तर कुटुंबीयांना हा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला नसता, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
या घटनेत आणखी एक हृदयद्रावक बाब समोर आली आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी प्रशांत कदम यांनी आपल्या पत्नीला एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. मुलाच्या आयुष्यात वडिलांचे स्थान काय असते, हे सांगणारा तो व्हिडिओच त्यांचा शेवटचा संदेश ठरला. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा