• Sun. Jun 14th, 2026
    इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीरसंबंध, नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली

    Navi Mumbai Bogus Scientist : राहणीमान मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून आरोपी तरुण हा डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राज्य हादरले असतानाच, नवी मुंबईत महिलांच्या लैंगिक शोषणाचा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचे सांगून उच्चशिक्षित व उच्चभ्रू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

    काय आहे प्रकरण?

    आदर्श म्हात्रे असे त्याचे नाव असून, त्याने डझनभर महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचे समोर आले आहे. केवळ दहावी पास असलेल्या आदर्शने विवाह जुळवणारी संकेतस्थळे व अन्य सोशल मीडिया व्यासपीठांवर बनावट प्रोफाइल तयार केली होती. कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, तर कधी ‘पीडब्ल्यूडी’मध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे तो सांगायचा.

    शरीरसंबंध आणि पैशांची लूट

    राहणीमान मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून तो डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर पैशांची गरज असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणे, ही त्याची ‘मोडस ऑपरेंडी’ होती.
    Maharashtra TimesCrime News : मिल्कशेक पिताच कॉन्स्टेबलचा मृत्यू, तीन वर्षांनी सिनेस्टाईल गुपित उलगडलं, लेकीचा Ex Boyfriend फुटला, महाराष्ट्र थक्क

    राज्याच्या विविध भागात महिलांना फसवलं

    आदर्श हा एका महिलेकडून लुबाडलेले पैसे दुसऱ्या महिलांसाठी वापरायचा. उरलेली रक्कम तो मौज मजा व चैनीच्या आयुष्यावर, तसेच कॅसिनोमध्ये उडवायचा. त्याने केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा विविध शहरांतील अनेक महिलांना जाळ्यात ओढले असून, आत्तापर्यंत त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत ११ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे आदर्शला अटक केली. या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    भोंदू अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ, रुपाली चाकणकरांच्याही अडचणी वाढणार?

    बोगस शास्त्रज्ञाची १२ नावे

    पोलिस तपासात आदर्श म्हात्रेने स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुश म्हात्रे, रूद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावे वापरल्याचे आढळून आले आहे. तो अत्यंत चलाखीने आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करायचा. नाशिकच्या अशोक खरातने भोंदूबाबाचा मुखवटा ओढून महिलांची फसवणूक केली, त्याच धर्तीवर आदर्शने बोगस शास्त्रज्ञ बनून महिलांच्या आयुष्याशी खेळ केल्याचे उघडकीस आले आहे.
    Maharashtra TimesAshish Meshram : चार मुलांच्या आईकडे लैंगिक सुखाची मागणी, नकार दिल्याने जीव घेतला, टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला अटक

    पोलीस आयुक्तांचं आवाहन

    आदर्शने अनेक महिलांचे शोषण केले असल्याचा अंदाज असून बदनामीच्या भीतीने अनेक पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. महिलांनी विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवरील व्यक्तीची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. शिवाय कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा

    प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा