• Tue. Sep 8th, 2026

‘एमपीएससी’ परीक्षांमध्ये गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 7, 2026

मुंबई, ‍दि. ७ : एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये अनेक गुणात्मक व रचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. एमपीएससी पेपरफुटीच्या प्रकरणात सातत्याने अनुचित आरोप माझ्याविरोधात केले जात आहेत. यासंदर्भात 2 सप्टेंबर 2026 रोजी स्वयंस्पष्ट निवेदन जारी करण्यात आले होते. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम हा मी रुजू होण्यापूर्वीचा आहे, हे आधीच त्यात स्पष्ट केले आहे. याबाबत आयोगाने तक्रार प्राप्त होताच पोलिसांत तक्रार केली आणि त्याचा तपास सुरु आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती न होण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती एमपीएससीने गठीत केली आहे आणि राज्य सरकारनेही एक उच्चाधिकार समिती गठीत करुन विभागीय स्तरावर जाऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी सल्लामसलतीची प्रक्रिया आरंभ केली आहे, असे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी केले.

भीमनवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, वस्तुस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने माझ्याविरोधात वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने मी अत्यंत व्यथित आहे. मी पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून एमपीएससीमध्ये अनेक सुधारणा केल्या. स्पर्धा परीक्षेच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 चाळणी परीक्षा अशा एकूण 84 परीक्षा यशस्वीपणे घेतल्या आहेत. सुधारणांमुळे 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले. निकाल जाहीर होण्यातील प्रदीर्घ विलंब कमी केला आणि 1 महिन्यात निकाल जाहीर करता येईल, असे नियोजन केले आहे.

अजूनही बऱ्याच सुधारणा नियोजनाच्या पातळीवर आहेत. उद्देश हाच की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठा अबाधित रहावी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या विद्यार्थ्यांना यथोचित न्याय मिळावा, त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे. पारदर्शी आणि निष्पक्ष अशीच व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न सातत्याने करतो आहे आणि करीत राहीन. तथापि माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षण सुद्धा या पदावर राहणार नाही, असेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed