Ajit Pawar Plane Accident: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या तीन दिवसांच्या कामकाजात ही चर्चा होईल का आणि ती नाही झाली, तर दोन्ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे आमदार काय पवित्रा घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
शिंदेंनी मांडला होता प्रस्ताव
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी २७ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर, याविषयी सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची मागणी केली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही दुजोरा दिला होता. सभापती राम शिंदे यांनी या विषयावर अल्पकालीन चर्चा घडवण्याची सूचना दिली होती. उपमुख्यमंत्र्याचा अशा संशयास्पद वातावरणात मृत्यू होऊनही त्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता. तेव्हाही सभापतींनी याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. मात्र, त्यानंतर आक्रमक होऊन दोनदा आमदार शिंदे, मिटकरी, आमदार अनिल परब यांनीही चर्चा कधी होणार, याविषयी सभापती शिंदेंना विचारणा केली. मात्र, दर वेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याविषयी निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी स्पष्ट केले होते.
१७ मार्चला आमदार मिटकरी यांनी, ‘इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार की नाही, हे एकदा सांगा,’ या शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यावरही सभापतींनी अखेरच्या आठवड्यात चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
‘सरकारला गांभीर्य नाही’
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्याला सोमवारपासून सुरुवात होत असून, अंतिम आठवड्यात केवळ तीन दिवसच कामकाज आहे. त्यामुळे या तीन दिवसांत चर्चा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’वर याबाबत खदखदही व्यक्त केली. त्यांनी लिहिले, की सरकारकडून भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने सुरू आहे; पण त्याच वेळी अजितदादांच्या विषयावरही तितक्याच गांभीर्याने लक्ष राहणे गरजेचे आहे. दादांच्या विमान अपघाताची चर्चा ठरल्याप्रमाणे उद्याच्या कामकाजात व्हावी, ही विनंती. चर्चेची कुठलीही शक्यता नसल्यास विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारकडून विविध खात्यांवरील विषयांवर प्रश्न उपस्थित करून त्याबाबत उत्तर घेण्याचे आयुध आहे. मुख्यमंत्री अंतिम आठवड्याच्या उत्तराच्या माध्यमातून विरोधकांना शांत करतात का, याकडेही लक्ष असेल.
