Eknath Shinde: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने आपली ताकद दाखवून दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे.
नुकतीच झालेली सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक वादात सापडली आहे. या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. एकीकडे भाजपकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी आपल्या विचारांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र ऐनवेळी दोन जिल्हा परिषद सदस्यांना पोलिसांनी मतदान करू न दिल्याने आणि काही मते फुटल्याने शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आणि भाजपचा विजय झाला.
या निवडणुकीवेळी शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आक्रमक झाली असून आज मुंबईत याचे पडसाद उमटले. सातारा पोलीस अधीक्षकांबाबत विधानपरिषदेत मंत्र्यांनी आक्रमक भूमिका मांडल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. मात्र वस्तुस्थिती जाणून न घेता निलंबन करणं चुकीचं असल्याचं सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी पोलीस अधीक्षकांची पाठराखण केली.
दरम्यान, सभागृहातील खडाजंगीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सातारा प्रकरणावर भूमिका मांडली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी काही मंत्र्यांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही मंत्र्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
