सोलापूर, दि. ७ ऑगस्ट (जिमाका): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत असलेल्या या योजनेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये : – ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या अल्पमुदत पीककर्जासाठी ही योजना लागू
– ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकबाकी असलेली आणि ३१ मार्च २०२६ अखेर परतफेड न झालेली पीकर्ज खाती मुद्दल व व्याजासह २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती
– कर्ज रक्कम २ लाखांपेक्षा अधिक असल्यास शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत उर्वरित रक्कम भरल्यास शासनाकडून २ लाख रुपयांचा लाभ
– सन 2022-23, 2023-24 व सन 2024-25 या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षे वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ
सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारी :
जिल्ह्यातील प्रगती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मधील ९२६ संस्था व ७ हजार ५६७ सभासद तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया, माळीनगर शाखेतील ९८ शेतकरी असे एकूण ७ हजार ६९४ शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरले आहेत.
२४ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील 11 तालुक्यातील १ हजार ७८ गावांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. सदर यादी संबंधित ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय व बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आधार प्रमाणीकरणाची स्थिती
दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ अखेरची स्थिती पुढीलप्रमाणे:
– अपलोड केलेली खाती: ५९ हजार ८५१
– आधार प्रमाणीकरण पूर्ण: १९ हजार २५७
– प्रलंबित खाती: ६ हजार ६९०
– एकूण प्रमाणीकरण टक्केवारी: ७३.३५ टक्के
प्रमाणीकरण प्रलंबित राहण्याची प्रमुख कारणे म्हणजे अॅग्रीस्टक क्रमांक नसणे ३ हजार ८५६, शेतकरी मयत ८५५, देवस्थान भोगवादार वर्ग 2,3 खंडकरी शेतकरी इत्यादी ४९, स्थलांतरित 861 बायोमॅट्रिक कॅप्चर न होणे १३८, जमीन नावावर नसणे १३५ व इतर कारणे ८१ आहेत.
जनजागृती व समन्वय
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वृत्तपत्रांद्वारे आवाहन, फ्लेक्स बोर्डद्वारे माहिती प्रसार आणि सोलापूर वाहिनीवर चित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये समन्वयासाठी एकूण ८२ समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
प्रशासनाने आधार प्रमाणीकरणाची गती वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.
००००
