• Sun. Jun 7th, 2026
    Harshwardhan Sadgir : खचला, पुन्हा उभा राहिला आणि जिंकला; डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या जिद्दीचा संघर्षमय प्रवास

    वाघोली येथे झालेल्या ६८व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी दुहेरी किताब जिंकत दमदार कमबॅक केला. खेड्यातील कठीण परिस्थितीतून प्रवास करत त्यांनी टीकेला मैदानात उत्तर दिलं.

    हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : टीकेला उत्तर देण्यासाठी मैदानच निवडलं… आणि हर्षवर्धन सदगीर यांनी ते देऊनही दाखवलं. वाघोलीतील ६८व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दुहेरी किताब पटकावत त्यांनी दमदार कमबॅक केला. “हा संपला” म्हणणाऱ्यांना त्यांनी चितपट केलं. खेड्यातील कठीण परिस्थितीतून सुरू झालेला प्रवास, आर्थिक अडचणी, नोकरीसाठीची धडपड आणि त्यातून पुन्हा उभं राहत जिंकलेलं यश, सदगीरांची ही जिद्द आता ऑलिम्पिकच्या दिशेने झेपावते आहे.

    खेड्यातून सुरुवात : कठीण वास्तव

    हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितलं की, ‘मी अशा गावातून आलोय जिथे लाईट सुद्धा न्हवती… बसची सोय न्हवती’, म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर बेसिक सुविधा नसलेल्या गावातून हा मल्ल उभा राहिला. त्यांचे लहानपण अतिशय खडतर होते. घरची परिस्थिती बेताची आई-वडिलांना कुस्तीची काही खास माहिती नव्हती. आजोबा काहीवेळा कुस्ती खेळायचे असे ते सांगतात. माझीही तब्येत चांगली होती ते बघून त्यांनी मला अडवलं नाही. वडिलांनी कुस्तीमध्ये जाण्यास पाठिंबा दिला. माझ्या काही मित्रांना कुस्तीबद्दल माहिती होती त्याचा काहीसा फायदा झाला.

    पहिल्या कुस्तीच्या आठवणी…

    वडिलांनी कुस्तीमध्ये लावायचं ठरवलं आणि गावातील एका तालमीत टाकलं. पण कुस्ती करायची असेल तर एकच पर्याय तो म्हणजे काका पवार तालीम. वडिलांनी तालमीत टाकल्यामुळे मलाही आवड निर्माण झाली असे ते सांगतात. त्यांच्या करिअरमध्ये सुरुवातीपासूनच दिशा ठरलेली होती. पण काका पवारांच्या तालमीत गेल्यावर सुरुवातीला भीती, दडपण “आपल्याला जमेल का?” अनेक प्रश्न होते. हळू हळू शिकत गेलो. कुस्ती खेळून पैसे कमवायचो आणि त्यातूनच आहार आणि काही पैसे घरी द्यायचो, असंही त्यांनी सांगितलं.

    Maharashtra TimesSatara ZP मधील गोंधळ विधान परिषदेपर्यंत, उपसभापतींचे अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश, पण नंतर निर्णय राखून ठेवला

    काका पवार तालमीतील घडण

    काका पवार यांच्या तालमीत टाकल्यावर सुरुवातीला भीती वाटायची. परंतु काका पवार यांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष दिलं. सराव, शिस्त, आहार—सगळं व्यवस्थित लावून दिलं. सदगीर सांगतात, “त्यांनी माझ्यातील गुण ओळखले… आणि मला घडवलं.”

    २०१७ ला पहिला टर्निंग पॉईंट

    २०१७ ला जरा result दिसायला लागला असं ते स्वतः सांगतात. म्हणजे याआधी फक्त मेहनत… पण यानंतर त्यांना खात्री वाटायला लागली की आपण मोठं काही करू शकतो. आणि २०२० ला मी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी बनलो.

    नोकरीचा मुद्दा

    2020 मध्ये महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर त्यांनी नोकरी मागितली होती. मोठ्या नेत्यांना भेटले पण मिळाली नाही. आर्थिक अडचणी यायला लागल्या. अनेकांनी आता तू पैलवान राहिला नाही म्हणून चिडवलं. मी पूर्ण खचून गेलो होतो, अशी खंत हर्षवर्धन सदगीर यांनी व्यक्त केली.

    Maharashtra TimesAshok Kharat : ‘मी अवतारी पुरुष, तू मागील जन्माची अप्सरा, माझ्याशी लग्न कर’, अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड

    पुन्हा लढून स्वतःला सिद्ध केलं

    काल झालेल्या वाघोलीतील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी दुहेरी किताब जिंकला. तालमीतीलच मल्ल समोर होता. मात्र महेंद्र कायकवाड यांना पाडून महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. त्यावेळी मात्र हर्षवर्धन सदगीर यांनी सरकारबद्दल खंत व्यक्त केली. ‘आता मला तुमची नोकरी नको, मी स्वतःला सिद्ध केलं’. अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

    आता ऑलिम्पिकही लढणार

    महाराष्ट्रातील खेळाडू फक्त महाराष्ट्र केसरी स्पर्धा लढतात मात्र ऑलिम्पिककडे जाताना दिसत नाहीत, याबद्दल त्यांना विचारले असता, ‘मी आता हिंद केसरी साठी प्रयत्न करत आहे. त्यानंतर ऑलिम्पिकसाठीही प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा