• Wed. Sep 16th, 2026

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर यांना जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका असलेला जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मानसोपचार तज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर याचा पाय आणखी खोलात गेला आहे. संबंधित घटना केवळ जीव देण्यास प्रवृत्त केल्याची नसून हत्येचा संशय व्यक्त होत असल्याचे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यासह डॉ. नीलेश याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्याला गंगापूर पोलिसांमार्फत अटक होण्याची शक्यता आहे.

मानसोपचार तज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश जेजुरकर हा ९ मार्चपासून नाशिक शहरातून पसार होता. काही महिन्यांपासून तो पुन्हा शासकीय सेवेत रूजू झाला असून पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर यांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा (वय ४०) यांनी गळफास घेत आयुष्याची अखेर केली होती. या घटनेनंतर त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

या प्रकरणात नाशिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नीलेशने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा अर्ज न्यायाधीश माधव जामदार यांनी फेटाळला आहे. अर्जात कोणतेही तथ्य किंवा आधार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जेजुरकरच्या वकिलांनी संबंधित आदेशाला स्थगिती देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. परंतु, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने ही विनंतीदेखील फेटाळली आहे. बचाव पक्षामार्फत ॲड. अनिकेत निकम, अभिलाषा पवार, शासनामार्फत सरकारी अभियोक्ता स्वप्निल वाळवे, मूळ फिर्यादीमार्फत ॲड. अभयसिंह भोसले, अंकुर पहाडे, संजय कोकणे यांनी युक्तिवाद केला.

Mumbai Crime : ओल्या चादरीवरचे डीएनए, जजचा विश्वास बसेना; विलेपार्लेत फिजिओथेरपिस्ट अत्याचार-खून प्रकरणात फाशी सुनावलेला तरुण कसा सुटला?

शवविच्छेदनात फेरफार केल्याचा संशय

जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी संशयिताचे थेट किंवा अप्रत्यक्ष असे कृत्य असणे आवश्यक आहे, ज्यामुळे मृत व्यक्तीला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केले गेले. संशयिताचा हेतू मृत व्यक्तीला मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडण्याचाच होता, हे स्पष्ट सिद्ध झाले पाहिजे. केवळ त्रास दिल्याच्या आरोपांवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरवता येत नाही. या घटनेच्या अगदी जवळच्या काळात असे कोणतेही कृत्य घडलेले नाही, जे थेट जीव देण्यास कारणीभूत ठरेल. डॉ. नीलेश हे मानसोपचार तज्ज्ञ असून, त्यांना दोन मुली आहेत आणि त्यांची पत्नी मृत झाली आहे’ असा युक्तिवाद डॉ. नीलेश यांच्या वकिलांनी केला.

चुलत बहिणीच्या लग्नात अपमान

त्यावर सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी विरोध केला. ‘डॉ. नीलेश जेजूरकर यांचे एका महिला डॉक्टरसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून त्यांच्या पत्नीचा सतत मानसिक छळ सुरू होता. ५ मार्च २०२६ रोजी मृत पत्नीच्या चुलत बहिणीच्या लग्नात डॉ. नीलेश यांनी कौटुंबिक छायाचित्र काढण्यास नकार दिला आणि सर्वांसमोर पत्नीचा अपमान केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, ६ मार्च २०२६ रोजी सकाळी पत्नीने जीव दिला’ असा युक्तिवाद करण्यात आला.

Maharashtra TimesKanpur Murder : स्मार्ट दिसतोस रे.. लग्न नाही का केलं अजून? जुन्या नोकराला लाडीगोडी, घोळात घेऊन प्लॅन आखला, शालूची ‘धोखेबाजी’ उघड

नवऱ्याच्या मैत्रिणीने हिणवलं

जानेवारी २०२६ मध्ये डॉ. नीलेश यांच्या डॉक्टर मैत्रिणीने त्यांच्या पत्नीला फोन करून ‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस, तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे,’ अशा शब्दांत हिणवून मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

घटनास्थळाच्या छायाचित्रांनुसार खिडकीला दोरी बांधलेली आढळली. त्यामुळे अशा प्रकारे आत्महत्या होणे शक्य आहे का, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. बॉडीचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात झाले असून, तेथे डॉ. नीलेश कार्यरत होते. त्यामुळे शवविच्छेदन अहवालात फेरफार झाल्याचा आणि ही आत्महत्या नसून हत्या असण्याचा संशय सरकारी वकील आणि फिर्यादी पक्षाने व्यक्त केला.

यामुळे या प्रकरणातील संशयित डॉ. नीलेश जेजुरकर याचा पाय आणखी खोलात गेला आहे. यातील पती-पत्नी दोघेही डॉक्टर असल्याने या हायप्रोफाइल प्रकरणाकडे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. जामीन फेटाळल्याने संशयित जेजुरकरला अटक होण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesBaramati Crime : बारामतीकर तरुणीने घर सोडलं, ओळखीतील तरुणाचा विचित्र दबाव, महिला पोलिसांचं संवेदनशील समुपदेशन, लेक आईच्या मिठीत विसावली

न्यायालयाची निरीक्षणे

डॉ. नीलेश व त्यांची मृत पत्नी दोघेही नैराश्यावर उपचार घेत होते

९ एप्रिल २०२६ रोजी एका महिला डॉक्टरने दिलेल्या जबाबानुसार नीलेशच्या विवाहबाह्य संबंधांची पुष्टी होते

५ मार्च रोजी लग्नात झालेला जाहीर अपमान आणि ६ मार्च रोजी झालेली आत्महत्येत अत्यंत कमी कालावधी असल्याने गुन्हेगारी हेतू किंवा चिथावणी प्राथमिकदृष्ट्या दिसून येते

हे प्रकरण केवळ जीव देण्यास प्रवृत्त करण्याचे नसून हत्येचे असण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे