परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. खानापूर फाटा परिसरात किरकोळ वादातून हा राडा झाला असून, एका तरुणाच्या अंगावरून चक्क दोनदा स्कार्पिओ गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून नवा मोंढा पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील वसमत रोडवरील खानापूर फाटा परिसरात शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहा जणांनी सार्वजनिक शांततेचा भंग करत हाणामारी सुरू केली. सायंकाळची वेळ असल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होती. हाणामारी सुरू होताच परिसरात गदारोळ उडाला आणि दोन्ही गट एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करू लागले.
स्वतःच्याच सहकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न
या राड्यादरम्यान एका तरुणाने आपली उभी असलेली स्काॅर्पिओ गाडी सुरू केली आणि तेथून वेगाने निघण्याचा प्रयत्न केला. घाईघाईत गाडी काढत असताना त्याने मागे-पुढे न पाहता थेट गाडी पळवल्यामुळे त्याच्याच गटातील एक तरुण चाकाखाली आला. धक्कादायक म्हणजे, चालकाने पुन्हा गाडी रिव्हर्स घेतली आणि पुन्हा त्या तरुणाच्या अंगावरून गाडी घातली. सुदैवाने या संपूर्ण प्रकारात तो तरुण गंभीर जखमी झाला असला तरी त्याचा जीव वाचला आहे.
Beed News : कामावरून घरी आला, जेवण केलं अन् खोलीत गेला; काही तासांतच टिप्पर चालकाने टोकाचं पाऊल उचललं
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, सहा जणांवर गुन्हा
या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेची दखल घेत परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये एकूण सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९४, २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेली ही हाणामारी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
