• Sat. Jun 13th, 2026
    Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये थरार; ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा धक्का, तरुण कोसळला, रुग्णालयात दाखल

    कल्याण रेल्वे स्थानकात एका तरुणाने ओव्हरहेड वायरच्या पोलवर चढून हायव्होल्टेज ड्रामा केल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली असून प्रवाशांचे हाल झाले.

    कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरच्या पोलवर चढला तरुण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक येथे दुपारी एक थरारक प्रकार घडला. ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढलेल्या तरुणामुळे तब्बल दोन तास मध्य रेल्वे विस्कळीत झाली. वीजपुरवठा खंडित करून प्रशासनाने प्रयत्न केले तरी अखेर तरुणाला विजेचा धक्का बसून तो खाली कोसळला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या दरम्यान असलेल्या एका ओव्हरहेड वायरच्या खांबावर एक अज्ञात तरुण अचानक चढला. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच स्थानकात एकच खळबळ उडाली. ओव्हरहेड वायरमध्ये प्रचंड व्होल्टचा विद्युत प्रवाह असल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती आणि घडलंही तसचं शेवटी तरुणाला विजेचा धक्का बसलाच. दरम्यान यावेळी याप्रकरणामुळे जवळपास दोन तास लोकलचा खोळंबा झाला होता.

    प्रशासनाची तत्परता

    घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे सुरक्षा बल ( RPF ) आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्काळ त्या मार्गावरील वीजपुरवठा खंडित केला. पोलिसांनी त्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, त्याची काही मागणी आहे का, याबाबत विचारणा करण्यात आली, मात्र तरुण भेदरलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. त्यानंतर काही तरुणांनी त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तो तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    Maharashtra TimesRupali Chakankar: चाकणकरांना अटक करा, प्रदेशाध्यक्षपदावरून न हटवल्यास आम्हीच पक्ष सोडणार; ठोंबरेंचा आक्रमक इशारा

    प्रवासी आणि लोकल सेवेवर परिणाम

    ऐन गर्दीच्या वेळी वीजपुरवठा बंद करावा लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याणवरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या ठिकठिकाणी उभ्या राहिल्या. जवळपास 120 मिनिटे हा प्रकार सुरू असल्याने स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.

    शॉक लागून खाली पडला तरुण

    सुमारे दोन तासाच्या या थरारात या संबंधित तरुणाने खांबांच्या सहाय्याने प्लॅटफॉर्मच्या शेडवर जात पळून जायचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाला विजेचा धक्का लागला अन् हा तरुण खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    तरुणाने हे पाऊल का उचलले?

    पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला पण नको तो अनर्थ घडला. या तरुणाने हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा