• Sun. Jun 14th, 2026

    मुंबई मेट्रो 9चा मार्ग मोकळा! काशीगाव मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण; एप्रिल महिन्यापासून प्रवास सुरू

    मुंबई मेट्रो 9चा मार्ग मोकळा! काशीगाव मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण; एप्रिल महिन्यापासून प्रवास सुरू

    Mumbai Metro 9: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी काशीगाव मेट्रो स्थानकाची पाहणी केली. मेट्रो मार्गिका 9ची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली असून सर्व प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

    ठाणे: दहिसर ते मिरा भाईंदर जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 9चं काम आता पूर्ण होत आलं आहे. या मार्गावरील काशीगाव मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मेट्रो स्थानकाची पाहणी करताना याबद्दल माहिती दिली. गेल्या दीड दशकांपासून प्रलंबित असलेली मार्गिका मिरा भाईंदरकरांच्या सेवेक लवकरच दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

    सर्व प्रमाणपत्र प्राप्त

    मिरा भाईंदरमध्ये मेट्रो सुरू करण्याचं वचन 2009च्या निवडणुकीदरम्यान दिलं होतं. त्यानंतर 15 वर्षांनंतर हे स्वप्न सत्यात उतरले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मेट्रोची सर्व तांत्रिक कामं पूर्ण करून सुरक्षेसाठी प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. या कामांना वेळ लागल्यामुळे उद्घाटनाला विलंब झाला असून आता सर्व अडथळे दूर झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आता सुरक्षिततेची सर्व प्रमाणपत्रे प्राप्त झाली असून एप्रिल महिन्यात ही मार्गिका सुरू करणार असल्याचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

    दोन टप्प्यात सुरू होणार मार्गिका

    गेल्या डिसेंबर महिन्यापासून दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका सुरू होणार असल्याच्या घोषणा केल्या जात होत्या. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मेट्रो लाइन 9 ही दहिसर पूर्वे – अंधेरीपर्यंत जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 7च्या विस्ताराचा भाग आहे. मेट्रो 9 ला दोन टप्प्यात सुरू करण्याचं नियोजन आहे. पहिला टप्पा दहिसरे ते काशीगाव असून पुढील टप्पा काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत असेल. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मार्गिका लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, काशीगाव मेट्रो स्थानकाचं काम बाकी असल्यामुळे ही मार्गिका सुरू झाली नव्हती.

    आता या स्थानकाचं काम पूर्ण झालं असून मंत्री प्रताप सरनाईकांनी यावेळी स्थानकावरील आपत्कालीन यंत्रणा, दुर्घटना नियंत्रण कक्ष आणि प्रवासी सुविधांची पडताळणी केली. यानंतर हे स्थानक सुरू करण्याची घोषणा केली. या मार्गिकेवर तासाला 4500 प्रवासी म्हणजेच दिवसाला तब्बल 50 हजार प्रवासी प्रवास करू शकतात. तसेच, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच या मार्गिकेचं उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित असतील.

    Maharashtra TimesMumbai Metro: भुयारी मेट्रोत पुन्हा ‘नो नेटवर्क’, कंत्राटदारासोबत करार रद्द करण्याचा निर्णय; सर्व कंपन्यांच्या सेवा होणार बंद

    ही मेट्रो मार्गिका सुरू होताच मिरा भाईंदरकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच, दहिसरवरून अंधेरीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गिका 7 आणि डीएननगर जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 2बी वरूनही प्रवास करता येणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा