• Tue. Sep 15th, 2026

Western Railway: स्टेशन मास्तरांवर श्वानांचीही जबाबदारी! सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळाच्या आदेशानुसार नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Western Railway: स्टेशन मास्तरांवर श्वानांचीही जबाबदारी! सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळाच्या आदेशानुसार नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

महेश चेमटे,मुंबई : रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची ये-जा, गाड्यांची धावपळ आणि फलाटांवरील लगबग ही नेहमीचीच. मात्र, याच गर्दीत गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. कुत्र्यांचा कधी फलाटावर फेरफटका, कधी प्रतीक्षालयात, तिकीट खिडक्यांसमोर ठाण, तर कधी खाद्यपदार्थांच्या शोधात प्रवाशांच्या मागे लागणे, अशा प्रकारांमुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्याची जबाबदारी स्टेशन मास्तरांकडे सोपवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रत्येक स्थानकासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ३० जुलै रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, सर्व स्थानक अधीक्षक आणि स्टेशन मास्तर (प्रभारी) यांची भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला प्रतिबंध करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात भटका कुत्रा आढळल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर निश्चित होणार आहे.

Cabinet Meetings: मंत्रिबैठकीचा ‘महाराजा’ थाट! एअर इंडिया इमारतीत लवकरच मंत्र्यांची दालने हलवणार, 22व्या मजल्यावर होणार मसलती
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकेत दिलेले निर्देश आणि रेल्वे मंडळाच्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानकांवर भटक्या कुत्र्यांची तक्रार केल्यास ‘आम्ही काय करणार,’ असे म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांना हात वर करता येणार नाहीत.

डॉग ड्युटी अंतर्गत नोडल अधिकाऱ्यांना स्थानक परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त ठेवावा लागणार आहे. यासाठी संबंधित महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून भटक्या श्वानांचे व्यवस्थापन आणि आवश्यक कार्यवाही करावी लागणार आहे.
Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच! आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टिनवर छापा, धक्कादायक तपशील उघड
श्वान दिसल्यास कुणाला सांगणार ?
रेल्वे स्थानकातील नोडल अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानक परिसरात भटका कुत्रा दिसल्यास प्रवाशांना संबंधित अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधता येणार आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर त्वरित आणि जबाबदारीने कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांची जबाबदारी
-स्थानक परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त ठेवणे
-कुत्र्यांना हटवण्यासाठी स्थानिक प्रशासन, महापालिकेशी समन्वय साधणे
-भटक्या कुत्र्यांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोर करणे
-स्थानकाच्या प्रवेशद्वारावर नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक लावणे
-सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळ, मुख्यालय यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे

महेश चेमटे

लेखकाबद्दलमहेश चेमटेमहाराष्ट्र टाइम्स मुंबई आवृत्तीमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत. पायाभूत सुविधा, क्रीडा, वाहतूक संबंधित बातम्यांबाबत आवड. नामांकित वर्तमानपत्रात मुद्रित माध्यमांतील क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed